Ahilyanagar : धक्कादायक..! शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या

आहिल्यानगर (प्रतिनिधी ): शनि शिंगणापूर संस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. शनि शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे.

सोमवारी (२८ जुलै) पहाटे घरातच गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. भ्रष्टाचार प्रकरणाची सरकार चौकशी सुरू झालेली असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने आहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरात सकाळी आठ वाजता छताला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर शनि शिंगणापूर गावात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घरी गेले.

पोलिसांनी दोरीला लटकलेल्या अवस्थेत असलेला नितीन शेटे यांचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना अधिकच्या तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
