Akkalkot: भक्ती संस्कृतीला चालना देणारे स्थान म्हणजे वटवृक्ष मंदिर – आ.सरोज आहिरे

अक्कलकोट (प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत भक्ती-अध्यात्म या रूढी परंपरांना प्राचीन काळापासूनच अत्यंत महत्त्व आहे. अगदी द्वापार युगापासून विविध साधुसंत, अवतारी दैवत या भारत भूमीवर नावारूपास आले. त्यापैकी अगदी अलीकडील काळात पाहायचे झाल्यास श्री स्वामी समर्थांचा अवतार हा दैवी अवतार आपणास अनुभवता आलेले आहे.

या पाश्वभुमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची व स्वामी समर्थांची महती ही अनन्य साधारण आहे. आज अनेक भाविकांना स्वामींची प्रचिती येत आहे. स्वामींच्या प्रचितीमुळे भाविकांचा ओढा अक्कलकोट कडे वाढत आहे आणि स्वामी समर्थांच्या श्रद्धेवर विश्वास ठेवून भाविक भक्तीत गुंतत आहेत त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भक्ती संस्कृतीला चालना देणारे स्थान म्हणून नावारूपाला येत असल्याचे मनोगत नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आपल्या सहकाऱ्यांसोबत सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सरोज आहिरे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार सरोज आहिरे बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ननू कोरबू, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.

