सदाशिव माळगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोट — अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावचे सुपुत्र आणि सध्या पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सदाशिव माळगे सर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील जॉय सामाजिक संस्था आयोजित १० व्या वर्धापन दिनानिमित्त जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार माळगे सरांना प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक म्हणून माळगे सरांची एक खास ओळख निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सदाशिव माळगे सरांना सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र आणि “जॉय ऑफ गिव्हिंग” चे मेडल प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जोगेश्वरी भूषण डॉ. एम. डी. वळंजू यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते अविनाश दौंड, उच्च न्यायालयाचे वकील जगदीश जायले, समुपदेशक ऍड. रूषीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घरत, कुर्ला भूषण सत्येंद्र सामंत, डॉ. महेश अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलनाने झाली. योगिता हिरवे यांच्या स्वागतगीताने वातावरण भारावून गेले, तर भूषण मुळे यांच्या शिवगर्जनेने ऊर्जा भरली. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वैभव पाटील (नवी मुंबई समन्वयक) आणि कार्यध्यक्ष असूंता डिसोझा यांनी केले.
या राज्यस्तरीय गौरवाने सदाशिव माळगे सरांच्या शैक्षणिक कार्याची पावती मिळाली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित केल्या बद्दल विद्यार्थीप्रिय, निस्वार्थ, आणि
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून माळगे सर पुढील वाटचालीत यशश्री प्राप्त करोत, अशा शुभेच्छा त्यांना सर्व स्तरातून मिळत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!