वागदरी (ता. अक्कलकोट) – येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गावातील मान्यवर नागरिक, वाचनालयाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीकांत सोनकवडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये चौळ्ळे गुरुजी, कोट्याप्पा कोठे, वागदरीचे माजी सरपंच हुचप्पा अरूणे, श्री गुरूमुर्ती निलगार, श्री पंचाक्षरी शिवशंकर पुजारी, प्रकाश निलगार, शिवशरण बटगेरी, अप्पासाहेब दणुरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर वक्त्यांनी सावरकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या क्रांतिकारक विचारांची आणि स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण करून दिली.
चौळ्ळे गुरुजी यांनी आपल्या भाषणात सावरकरांच्या समाज प्रबोधनावर आणि विज्ञानवादी दृष्टिकोनावर भर दिला. हुचप्पा अरूणे यांनी सांगितले की, “सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते तर ते उत्कृष्ट कवी, लेखक, इतिहासकार आणि समाजसुधारक होते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे कर्मचारी सुरेश छुरे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांना अनुसरून नवे पिढी घडवण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी वाचनालयाच्या वतीने ग्रामस्थांसाठी विविध ग्रंथांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारलेले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय समिती आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.