Akkalkot Rural : रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अक्कलकोट-घोळसगांव बससेवा ठप्प ; प्रवासी नागरिकांची गैरसोय
अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील घोळसगांव रस्त्यालगत असलेल्या तलावाजवळील रस्त्यावर पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्या कारणाने अक्कलकोट – घोळसगांव महामंडळ बस सेवा गेल्या पंधरवड्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
गावांतील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्गाला शहरापर्यंत जाण्यासाठी एसटी बसची गरज आहे. बससेवा बंद करून पंधरा दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.
येथील गावकऱ्यांनी प्रत्येक कामासाठी शहरात जावे लागते. सर्वांच्या सोयीसाठी आणि सर्वसामान्यांना परवडणारी असलेली लालपरीच ठप्प झाल्यामुळे खासकरून विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासानाने याकडे लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून द्यावे आणि बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील नागरिकांना पंधरा दिवसापासून एसटी बस बंद झाल्यामुळे खूप त्रास होत आहे. विद्यार्थी म्हणा ,पेशंट , तहसील पंचायत समिती, विविध कामाला जाण्यासाठी त्रास होत आहे . तरी लवकरात लवकर संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून प्रवाशांचे सोय करून द्यावे..
– संजय होळे , तंटामुक्त अध्यक्ष घोळसगाव.