शेतीच्या मशागतीसाठी ना पैसे ना बैल, 65 वर्षांच्या शेतकरी आजी आजोबांनी स्वत:ला जुंपलं
देशाच्या कृषी क्षेत्राची अशी दयनीय अवस्था पाहिल्यानंतर प्रत्येकालाच वाईट वाटतंय. या आजी-आजोबांना सरकारकडून किंवा एखाद्या दानशूर व्यक्तीकडून मदत व्हावी एवढीच अपेक्षा.

शेतीच्या मशागतीसाठी ना पैसे ना बैल, 65 वर्षांच्या शेतकरी आजी आजोबांनी स्वत:ला जुंपलं

लातूर: — जुलै रोजी राज्यभर कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकीकडे शेतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाबद्दल चर्चा होत असताना दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वतः वखर चालवतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचे हे दयनीय चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकालाच संकोचल्यासारखं झालं. पवार कुटुंबावर अशी वेळ का आली? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती हे पवार कुटुंबियांचं गाव आहे. घरी अडीच एकर कोरडवाहू शेती. मुलीचे लग्न झाले तर मुलगा पुण्यामध्ये छोटे-मोठे काम करून पोट भरतो. सून आणि नातवंडे आजी-आजोबांकडे असतात. घराचा चरितार्थ चालवावा म्हणून आजोबा अंबादास पवार आणि आजी शांताबाई पवार या स्वतः शेतामध्ये राब राबतात.
80 हजार खर्च अन् केवळ 10 हजार उत्पन्न, रोगाच्या प्रादुर्भाने मिरची पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर आली वेळ,
मजुरी परवडेना, खर्च कुठून करायचा?
मजुरीचा खर्च एवढा वाढला आहे की ट्रॅक्टरने पेरणी करणे परवडत नाही. बैल बारदानाही घेऊ शकत नाही. शेतीमध्ये जेवढे पैसे लावले त्यापेक्षाही कमी पैसे हाती येतात. बँकेकडून 40 हजारांचं कर्ज घेतलंय ते कर्ज दरवर्षी भरतो आणि पुन्हा कर्ज काढतो. आमचं गळ्या एवढं सोयाबीनचे पोतं 4 हजार रुपयांचा जातंय आणि 25 किलोची सोयाबीनची बियाण्यांची बॅग आम्हालाच 3 हजारात मिळते. खताचा भाव बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत वाढलाय. जेवढं शेतीमधून उत्पन्न निघतंय तेवढं त्यातच लावावं लागतंय. चरितार्थ भागवण्यासाठी असं काम करावं लागत असल्याचं आजोबा अंबादास पवार यांनी सांगितलं.
हात-पाय चालतात तोपर्यंत…
“आमच्याकडे पाच एकर सामायिक जमीन आहे. पाण्याची सोय नाही. मुलगा पुण्यात जाऊन पोट भरतो. मुलगा शिकला नाही म्हणून त्याला अशी वेळ आलीये. नातवंडांवर तरी ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही जोपर्यंत हात-पाय चालत आहे तोपर्यंत शेतामध्ये काम करतोय. ते करण्याशिवाय आम्हाला पर्याय देखील नाही. शासनाने आमचं कर्ज माफ करावं आणि शेतीसाठी खतं-बियाण्याची व्यवस्था करावी,” अशी मागणी शांताबाई पवार यांनी केली.

दरम्यान, आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी भरारी घेतोय. अगदी मंगळ ग्रह देखील आपल्याला दूर राहिला नाही. परंतु देशाच्या कृषी क्षेत्राची अशी दयनीय अवस्था पाहिल्यानंतर प्रत्येकालाच वाईट वाटतंय. या आजी-आजोबांना सरकारकडून किंवा एखाद्या दानशूर व्यक्तीकडून मदत व्हावी एवढीच अपेक्षा.

