श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी.
अनेक भाविक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक
(श्रीशैल ग़वंडी, दि.१०/०७/२५.अ.कोट)
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा
उत्सव मोठ्या भक्तीभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींच्या दर्शनास भाविक विशेष महत्व देतात. आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले.
भाविकांची गर्दी लक्षात घेवून स्वामी दर्शनाकरीता मंदीर परिसराचा महाद्वार राञी २ वाजता उघडण्यात आला होता. पहाटे ४ वाजता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांसह भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती व गुरुपुजन केले. तदनंतर मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरात पत्राशेड व शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. सकाळी ६ नंतर भाविकांची रांग फत्तेसिंह चौकापर्यत लांबली होती ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली. सकाळी १०:३० वाजता श्री गुरुपौर्णिमेनिमीत्त श्रीं ची महानैवेद्य आरती मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली. तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात आले.
आज गुरुपौर्णिमेनिमित्त देवस्थानच्या वतीने
सकाळी ११ ते ३ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे आयोजीत करण्यात आलेल्या भोजन महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. गुरूपौर्णिमेनिमीत्त आज मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे व अन्य मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदीर समितीच्या वतीने भाविकांच्या सेवार्थ मंदीर परिसरात ठिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदीरात येणेसाठी एक रस्ता, बाहेर जाणेसाठी एक रस्ता, योग्य ठिकाणी दोन चप्पल स्टँड, मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तीगीतांचे वादन, महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगेतून विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पाऊसा पासून संरक्षणा करीता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यत पत्राशेड उभा करण्यात आले होते. मंदीर समितीच्या या नियोजनबध्द दर्शन व्यवस्थेमुळे कोणतीही बाधा निर्माण न होता अबाल वृध्दांसह सर्वच स्वामी भक्तांचे दर्शन अत्यंत सुलभतेने झाल्याने भाविकांनी समाधानाची प्रतिक्रिया देवून मंदीर समितीचे आभार मानत श्री स्वामी समर्थाच्या रूपातून गुरु भेटीचे दर्शन झाल्याने धन्य झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.शिवशरण अचलेर, पाटील सर, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणे व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ – गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सजविलेली मूर्ती व भाविकांची गर्दी दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!