

गुरुपौर्णिमेनिमित्त वागदरी शाळेत भावनिक वातावरणात पालकांचे पूजन

अक्कलकोट (प्रतिनिधी) – गुरूशिष्य परंपरेचे स्मरण करत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वागदरी येथे गुरुपौर्णिमा अत्यंत भावनिक आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु असलेल्या आई-वडिलांचे पूजन करून गुरुप्रतिनिधींचा सन्मान केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे होत्या. महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाय धुऊन, त्यांना कुंकू फुले वाहून, आरती करून त्यांच्या चरणी वंदन केले. काही विद्यार्थ्यांनी आजी-आजोबा, तर काहींनी वडील व आईंचे पूजन करून आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

शाळेच्या शिक्षिका मनिषा कुणाळे यांनी गुरूचे महत्व केवळ समजून घेण्यात नव्हे तर ते आचरणात आणण्यात आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना सद्गुणी मार्गावर चालण्याचे प्रेरणादायी उद्बोधन केले. शिक्षक तोलन बागवान यांनी “आईवडिलांची सेवा करा, गुरूंचे मार्गदर्शन स्वीकारा – यश तुमच्या पावलांशी खेळेल,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना गुलाबपुष्प देत गुरुवंदना केली. उपस्थित पालकांनी मुलांनी केलेले पूजन पाहून भारावून गेले. शाळेच्या शिक्षिका अनुसया कलशेट्टी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून उपस्थितांचे आभार मानले.