निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज : कारंडे
आधुनिक पत्रकारिता : आव्हाने आणि संधी या विषयावर कार्यशाळेत मंथन
सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता हवी : कुलगुरू डॉ. महानवर
सोलापूर,दि. २० : काळानुसार पत्रकारितेत बदल होत आहेत. तांत्रिकसह कंटेंट बदलत आहे. माहितीचा भडीमार होत आहे. यामध्ये निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे. पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे. पत्रकारितेला संघर्ष नवा नाही. नवी आव्हाने पत्रकार पेलतील, असा विश्वास इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रीय संकुल, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी विचारमंचावर दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर, दैनिक सुराज्यचे वृत्तसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे पुढे म्हणाले, गेल्या वीस वर्षात पत्रकारिता क्षेत्र वेगाने बदलत आहे. या बदलानुसार पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात विद्यापीठांनी बदल करणे गरजेचे आहे. पत्रकार म्हणून अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. वृत्तपत्रातील माहिती बिनचूक आहे का हे महत्त्वाचे ठरते. पत्रकारितेतील आव्हाने याची काळजी करण्यापेक्षा सक्रियपणे काम केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ताने अनेक गोष्टी सुकर केल्या आहेत. तंत्र व कंटेंट हे मोठे आव्हान आहे. माहितीचा वर्षाव सर्वत्र होत असताना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पत्रकारिता करण्याची आज आवश्यकता आहे. घटनास्थळावर गेल्यास तेथील घटनेची संवेदनशीलता आणि इतर कंगोरे मिळतात. या दृष्टिकोनातून निष्पक्षपणे पत्रकारिता करणे ही कसरत आहे मात्र ते करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, प्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये. घाई न करता योग्य तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सुदृढ पत्रकारितेला गालबोट लागू नये याची काळजी घेणे आता गरजेचे आहे. परिणामी समाजाचा विश्वास कमी होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर म्हणावा तितका या क्षेत्रात होत नाही. माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संधी आणि आव्हानही आहे. सोशल मीडियामुळे चुकीच्या बातम्याही येतात. अशा बातम्यांमुळे समाजात संवेदनशीलता निर्माण होते. सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता आज गरजेची आहे, असे ते म्हणाले.
संपादक महेश रामदासी म्हणाले, पत्रकारांसमोर कुठलेही आव्हान नसावे. आधुनिक पत्रकारितेमध्ये एआय संधी म्हणूनच स्वीकारले पाहिजे. सोशल मीडिया जसा शिकला तसे एआय स्वीकारले पाहिजे. थेट घटनास्थळावरची पत्रकारिता महत्त्वाची आहे. पत्रकारितेत विश्वासाहर्ता जपली पाहिजे. हेच खरे आव्हान आहे. रोखठोक प्रश्न विचारणारे पत्रकार कमी आहेत. बटीक म्हणून न राहता माध्यमांची प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे.
संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात नवे बदल होत आहेत. पत्रकारितेमध्ये सध्या विश्वास टिकवणे आवश्यक आहे. तटस्थ पत्रकारिता सध्या राहिली नाही. त्या अनुषंगाने आता पत्रकारिता होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी विद्यापीठातील जन संज्ञापन विभागातील विविध कोर्स आणि अभ्यासक्रमाची माहिती दिली.
प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आणि पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यशाळेमागचा उद्देश प्रास्ताविकेत स्पष्ट केला. सहाय्यक प्रा. डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक प्रा. डॉ. अंबादास भासके यांनी आभार मानले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह शहर – जिल्ह्यातून विविध माध्यमांचे पत्रकार, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–
Back to top button
×
No WhatsApp Number Found!