श्रावण मासात मौन अनुष्ठानाची पर्वणी : प.पू. लिंगय्या देवरू ४१ दिवस मौन साधनेत
श्रावण मास विशेष

श्रावण मासात मौन अनुष्ठानाची पर्वणी : प.पू. लिंगय्या देवरू ४१ दिवस मौन साधनेत

अक्कलकोट, दि. २६ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथील श्री शिवबसवेश्वर विरक्त मठाचे नूतन उत्तराधिकारी प.पू. लिंगय्या देवरू यांनी श्रावण मासानिमित्त सोमवारपासून ४१ दिवसांच्या मौन अनुष्ठानास प्रारंभ करण्याचा संकल्प केला आहे.

हे मौन अनुष्ठान समस्त भक्तगण व लोककल्याणासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान, गुड्ड कारुणी, सलगर या महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर वसलेल्या पवित्र जागृत देवस्थानात होणार आहे. सोमवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता अनुष्ठानास सुरुवात होणार असून, शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी याची पूर्णाहुती होईल.

पूर्णाहुतीनिमित्त शुक्रवारी पहाटे ५ वाजता श्री सिद्धेश्वर मूर्तीसमोर एकादश महारुद्र अभिषेक व चंडी होमहवन पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता हरगुरू चरमुर्ती शिवाचार्य शिवयोगी यांच्या दिव्य सान्निध्यात धर्मसभा व मौन अनुष्ठान समाप्ती सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होईल.

या विशेष अनुष्ठानानिमित्त कारुणी-सलगरसह पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवर्यांचे आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त सलगर ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.
