गावगाथा

डीजे डॉल्बीच्या विरोधात एकवटले हजारो सोलापूरकर!

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात एक लाख स्वाक्षरी मोहिमेत २४ हजार सोलापूरकरांनी केल्या स्वाक्षऱ्या : मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

डीजे डॉल्बीच्या विरोधात एकवटले हजारो सोलापूरकर!
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात एक लाख स्वाक्षरी मोहिमेत २४ हजार सोलापूरकरांनी केल्या स्वाक्षऱ्या : मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग
सोलापूर : नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी १०० टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल २४ हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करीत डीजे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शविला.
सोमवारी सकाळी ६ ते रात्री ११ अशी तब्बल सलग १५ तास ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले. यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉल्बीला विरोध केला.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉल्बी पासून उद्भवणारे आजार, धोके सांगत प्रबोधन केले आणि कर्णकर्कश डीजे डॉल्बीपासून सोलापूरकरांनी दूर राहात पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, व्यापारी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला संघटनांच्या प्रतिनिधी आदींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.
सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींना डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९८६०८२२२८३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आले आहे.
———–
पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना देणार
सजग सोलापूरकर समितीतर्फे एक लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन डीजे डॉल्बी बंद करण्याबाबतचे निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button