गावगाथा

भगवान गोपालकृष्णांनी प्रत्येक जीवाला सुयोग्य कर्म करण्यास प्रवृत्त केले होते – कीर्तनकार ह.भ.प.पुरोहीत..

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींची १२७ वी मासिक सेवेप्रती महेश इंगळे यांचे मनोगत

भगवान गोपालकृष्णांनी प्रत्येक जीवाला सुयोग्य कर्म करण्यास प्रवृत्त केले होते – कीर्तनकार ह.भ.प.पुरोहीत..
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींची १२७ वी मासिक सेवेप्रती महेश इंगळे यांचे मनोगत
(श्रीशैल गवंडी, दि.२०/०८/२०२५.अ.कोट)
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा “जन्मा येणे घडे पातकाचे मूळ | संचिताचे फळ आपुलिया ||” या अभंगावर निरूपण करताना क्रियमाण कर्म, संचित आणि प्रारब्ध या तीनही संकल्पना सविस्तर विशद करून; “कर्मविपाक सिद्धांत” म्हणजे नेमके काय हे त्यांनी पूर्वरंगाच्या माध्यमातून अनेक दृष्टांत देऊन स्पष्ट केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला यांच्या पार्श्वभूमीवर; भगवान गोपालकृष्णांनी प्रत्येक जीवाला सुयोग्य कर्म करण्यास प्रवृत्त केले असे निरुपण कर्जत-रायगड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार “रायगड भूषण” ह.भ.प.श्रीराम अनंत पुरोहित यांनी केले.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात आज डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी तर्फे १२७ वी मासिक सेवा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. या प्रसंगी कीर्तनकार ह.भ.प.श्रीराम पुरोहित बोलत होते. कीर्तन सेवेच्या मध्यास मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार श्रीराम पुरोहित यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी चैतन्य स्वरूप सद्गुरु अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत पदयात्रा, जप, नामस्मरण, मानसपुजा, कीर्तन, भजन, गायन या सेवेत, अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामीसेवकांसाठी मनोरंजनाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक कीर्तन सेवेचे आयोजन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये “स्वामी हो” गृप आणि “डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी”चे सोमदत्त आसोलकर करत आलेले आहेत असे भावोद्गार देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी काढले. पुढे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना केलेले मार्गदर्शन आणि अर्जुनाला कर्मप्रवृत्त करून; पांडवांना विजय प्राप्तीसाठी भगवान श्री शंकरांची आराधना करण्याबाबत केलेले मार्गदर्शन यावर आधारित आख्यान ह.भ.प.श्रीराम पुरोहित यांनी उत्तररंगातून सादर केले. या कीर्तन सेवेत मयुर स्वामी, अक्कलकोट यांनी संवादिनीवर तर श्री.सुनील शेलार सर, अंबरनाथ यांनी तबल्यावर श्री.पुरोहित यांना उत्तम साथसंगत केली. सकाळच्या सत्रात जप, नामस्मरण आणि मानसपूजा या सेवा स्वामीचरणी संपन्न झाल्या. मानसपुजेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत डिंगोरकर आणि संतोष रहाटे यांनी केले. या प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, संतोष जाधव, श्रीशैल गवंडी, रविराव महिंद्रकर, स्वामीनाथ लोणारी, विपूल जाधव, सागर गोंडाळ, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, दर्शन घाटगे, स्वामीनाथ मुसळे आदींसह भाविक भक्त मोठया संखेने उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात कीर्तनसेवा सादरीकरण प्रसंगी ह.भ.प. श्रीराम बुवा पुरोहित दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button