रेशनकार्ड धारकांसाठी सावधानता..! आता चारचाकी आणि जास्त जमीन असल्यास रेशन होणार बंद ; पडताळणी सुरू

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन व्यवस्था) स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचावे, या उद्देशाने ‘मिशन सुधार’ अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी केली जाणार असून, एकूण 10 ठोस निकष लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी अपात्र लोकांनी रेशन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मोठी जमीनधारणा, चांगले उत्पन्न, चारचाकी गाड्या असूनही स्वस्त धान्य घेणारे लाभार्थी सापडत होते. यामुळे खऱ्या गरजू लोकांचा हक्क डावलला जात असल्याची भावना निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता डिजिटल डेटाचा वापर करून व्यवस्था स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतजमिनीचा सविस्तर डेटा तयार करण्यात आला आहे. या डेटाच्या आधारे अडीच एकरपेक्षा (1 हेक्टर) अधिक जमीन असलेले आणि उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी शोधले जाणार आहेत. अशा लोकांचे स्वस्त धान्य थांबवले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू असून एकूण 4 लाख 76 हजार 207 शिधापत्रिकांची सखोल तपासणी होणार आहे. सध्या सुमारे पावणेचार लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून यापूर्वी 68 हजार अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे.
नवीन तपासणीसाठी दुबार शिधापत्रिका, कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न, कंपनी संचालक असलेले सदस्य, अडीच एकरपेक्षा जास्त जमीन, चारचाकी वाहन मालकी, संशयास्पद आधार क्रमांक, 6 महिन्यांपासून धान्य न उचलणारे लाभार्थी, 18 वर्षांखालील एकमेव लाभार्थी आणि 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लाभार्थी असे 10 निकष लावण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या मते, या मोहिमेमुळे अपात्र लोक योजनेबाहेर पडतील आणि गरजू कुटुंबांना योग्य न्याय मिळेल. नागरिकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि शिधापत्रिकेतील माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



