वागदरी पंचायत समिती गटासाठी युवा तडफदार विनोद घुगरे यांची काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी
वागदरी / प्रतिनिधी –आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वागदरी पंचायत समिती गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, वागदरी येथील सामाजिक कार्यकर्ते, नाट्यकलावंत आणि काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते विनोद घुगरे यांनी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समिती उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे.
खासदार प्रणिती ताई शिंदे यांची भेट घेऊन विनोद घुगरे यांनी वागदरी पंचायत समिती गटासाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी गटातील सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक प्रश्नांची सविस्तर माहिती मांडत, तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याची गरज अधोरेखित केली.
विनोद घुगरे हे तरुण, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. गणेशोत्सव, विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नाट्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून, युवकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. सामाजिक कामातून त्यांनी गावात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
वागदरी पंचायत समिती गटात काँग्रेस पक्षाने तरुण उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते व युवकांकडून होत आहे. “नवीन विचार, नव्या ऊर्जेसह काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाला संधी मिळावी,” अशी भावना यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून युवा उमेदवारांना संधी दिली जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, विनोद घुगरे यांची उमेदवारी निश्चित होते का, याकडे संपूर्ण वागदरी गटाचे लक्ष लागले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!