शिवानंद पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपला मोठा राजकीय धक्का
सोलापूर | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अक्कलकोटचे दिवंगत माजी आमदार कै. सिद्धारामप्पा पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व असलेले शिवानंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. त्यांच्या सोबत अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, तसेच दिलीप पाटील आणि इतर सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शिवानंद पाटील हे जिल्हा परिषदेत प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. भाजप सोडण्यामागचे अधिकृत कारण जाहीर झाले नसले, तरी पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक नेतृत्वाशी झालेल्या वैचारिक संघर्षामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा आचारसंहितेमुळे रद्द झाल्याने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता पण आज जिल्हा अधक्ष्य उमेश पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
या पक्षप्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे मानले जात असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!