*छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेणे काळाची गरज — प्रा. डॉ. किशोर थोरे*
*ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन*

सोलापूर (प्रतिनिधी) — “आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या जीवनातून तरुणांना नेतृत्व, दूरदृष्टी, नियोजन आणि आत्मविश्वास यांचे अमूल्य धडे मिळतात,” असे मत इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. किशोर थोरे यांनी व्यक्त केले.
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय शिकावे?’ या विषयावर प्रा. थोरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणक्रमात झालेल्या बदलांचा संदर्भ देत, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्वांकडून मूल्यशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे,” असे सांगितले.

प्रा. थोरे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले. विशेषत: अफजलखान भेटीतील रोमहर्षक प्रसंगाचे वर्णन करताना त्यांनी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, वेळेचे नियोजन व नेतृत्वकौशल्य अधोरेखित केले. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे हितचिंतक आणि कुशल राज्यकारभारी होते. त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राने दुष्काळांचा सामना केला, तरी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही — हेच त्यांच्या लोकाभिमुख कारभाराचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.
“आजच्या काळात समाजातील संस्कारपीठ कमकुवत झाले आहे. म्हणून तरुणांनी स्वतःहून प्रयत्न करून शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रत्येक संकट हे जीवघेणे असतानाही महाराजांनी आपल्या बुद्धी, संयम आणि नियोजनाच्या जोरावर मार्ग काढला, हीच त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी शिकवण आहे,” असे प्रा. थोरे यांनी ठामपणे नमूद केले.
या प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ.एम. ए.चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, संगणक विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, ई&टीसी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती वळसंग यांनी केले तसेच त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व आभार साबळे मॅडम यांनी मानले
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी प्रा. थोरे यांच्या प्रेरणादायी विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!