वागदरी जिल्हा परिषद गटात राजकीय रणधुमाळी ; भाजपात शेळके — तानवडे यांच्यात तिकीटासाठी चुरस
काँग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात, शिवसेना शिंदे गटात नव्या समीकरणांची हालचाल; तिरंगी लढत अटळ
वागदरी (ता. अक्कलकोट) – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वागदरी गटात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपात तिकीटासाठी माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे आणि एस.एस. शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके यांच्यात चुरशीची रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात असून शिवसेना (शिंदे गट) नव्या समीकरणांच्या तयारीत आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजपातील अंतर्गत गटबाजी वाढली
वागदरी जि.प. मतदारसंघ ओबीसी आरक्षित झाल्याने काही इच्छुकांना अडथळा आला असला, तरी स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. भाजपात माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे आणि तरुण नेतृत्व बसवराज शेळके यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
तानवडे यांनी मागील कार्यकाळात पक्षभेद न करता विकासकामे केली असून त्यांचे या भागात चांगले वर्चस्व आहे. मात्र सध्या त्यांना स्वपक्षीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे तालुका भाजप नेतृत्व चिंतेत आहे.
बसवराज शेळके – तरुण नेतृत्वाचा प्रभाव
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक असलेले आणि त्यांच्या विजयासाठी मैदानात काम करणारे बसवराज शेळके यावेळी नशिब आजमावणार आहेत. शिक्षणक्षेत्रातील अनुभव, संघटनात्मक कामकाज आणि तरुण कार्यकर्त्यांशी असलेला संवाद या बाबींचा फायदा त्यांना मिळू शकतो, अशी चर्चा आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेची रणनीती
काँग्रेसला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धक्का बसला आहे. तरीही नव्याने नियुक्त तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून माजी जि.प. सदस्य विजयकुमार ढोपरे यांचे नाव चर्चेत असून हनिफ मुल्ला हेही संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत.
आगामी लढत रंगणार चुरशीची
एकंदरीत वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे.
भाजपातील गटबाजी, काँग्रेसचा उमेदवार शोध, आणि शिवसेनेतील नव्या हालचालींमुळे या गटातील निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!