गावगाथा

*मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘बोलींचा जागर’; विद्यापीठात भाषा तज्ज्ञांची बैठक*

बैठक

*मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘बोलींचा जागर’; विद्यापीठात भाषा तज्ज्ञांची बैठक*
पुणे :
मराठीतील विविध बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात १९ डिसेंबर रोजी बोली अभ्यासक व तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बोली भाषा नष्ट होण्यामागील कारणांचा आढावा घेणे, त्यासाठी उपक्रम, सर्वेक्षण व संकलनाच्या माध्यमातून बोलींचे जतन करणे, तसेच विद्यापीठ स्तर, अभ्यासक कार्यशाळा व प्रत्यक्ष कार्यक्षेत्र अशा तीन टप्प्यांत ‘बोलींचा जागर’ राबविण्याचे उद्दिष्ट असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
भाषा संचालनालयाचे भाषा संचालक अरुण गीते यांनी तालुका स्तरावर, शिक्षण संस्था व महाविद्यालयांमध्ये बोली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किमान तीन तासांचे कार्यक्रम राबवावेत, असे सांगितले. बोली ही केवळ संवादाची साधने नसून त्या त्या प्रदेशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस भाषा संचालनालयाचे संतोष गोसावी, भारत जाधव, डॉ. संजय पवार, आनंद गांगण, तसेच डॉ. सोनल कुलकर्णी (डेक्कन महाविद्यालय) आणि डॉ. केशव देशमुख (मराठी भाषा सल्लागार समिती) उपस्थित होते. बोली अभ्यासक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या वेळी १३ बोली अभ्यासकांनी राज्यातील विविध प्रदेशांतील बोली, त्यांची भाषिक वैशिष्ट्ये, शब्दसंपदा, लोकपरंपरा, म्हणी, उखाणे व लोकगीते यांवर आपले विचार मांडले. डॉ. सोनल कुलकर्णी यांनी बहुभाषिकतेचे महत्त्व व बोलींच्या शास्त्रीय संकलनाची गरज अधोरेखित केली. डॉ. केशव देशमुख यांनी तरुण लेखकांनी बोलींमधून लेखन करावे, तसेच शेतकरी, महिला व सामान्य माणसांच्या बोलींवर संमेलने घ्यावीत, असे मत व्यक्त केले.
मालवणी, माणदेशी, चंदगडी, ठाकर, मराठवाडी, मावळी, डांगी, दुबळा, अहिराणी, सीमाभागातील बोली तसेच तमाशा कलावंतांच्या बोली यांवर सादरीकरणे झाली. बोलींचे जतन म्हणजे सांस्कृतिक वारशाचे जतन असल्याचा सूर अभ्यासकांच्या मांडणीतून व्यक्त झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ व महाराष्ट्र गीताने झाली. मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. उमेश सिरसट यांनी केले, तर डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button