गावगाथा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मिरवणूक उत्साहात; शिवमय वातावरणाने अक्कलकोट दुमदुमले

दिनविशेष

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मिरवणूक उत्साहात; शिवमय वातावरणाने अक्कलकोट दुमदुमले

अक्कलकोट : येथील धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाली. शिवकालीन पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या थरारक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक देखावे पाहण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “छत्रपती शिवाजी महाराज की जय…! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय…!” या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
मिरवणुकीस प्रारंभ राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आई तुळजाभवानी माता व धर्मवीर शंभूराजे यांच्या पूजनाने करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, पोलीस निरीक्षक दिपक भिताडे, उपनगराध्यक्ष ऋतुराज (बंटी) राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. बागाव यांच्यासह विविध मान्यवर, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरवणुकीत अंबारीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक मूर्ती सहभागी करण्यात आली होती. तसेच सह्याद्री प्रतिष्ठान कराड यांच्या वतीने लाठी-काठी, तलवारबाजी यांसारखी पारंपरिक युद्धकला सादर करण्यात आली. कलारत्न फाउंडेशन, मंगळवेढा यांच्या वतीने “गाथा स्वराज्य रक्षकाच्या बलिदान व स्त्री सुरक्षितता हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती” हा संदेश देणारे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सातारा येथील ‘कांतारा’ चित्रपटातील प्रसंगांवर आधारित सजीव देखावे तसेच आई तुळजाभवानी मातेचा भव्य देखावा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले.
कलाकारांनी साकारलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखाव्यांमुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, महर्षी वाल्मिकी मार्ग, विजय चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर चौक, सेन्ट्रल चौक, सर्जेराव जाधव पथ, समर्थ चौक मार्गे राजे फत्तेसिंह चौक येथे येऊन सांगता करण्यात आली.
मिरवणूक यशस्वी करण्यासाठी धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतिश पवार यांच्यासह भरत राजेगांवकर, देविदास गवंडी, सुरज भोसले, गणेश पाटील, प्रसाद मोरे, अजय वाझरे, दिनेश पाटील, लक्ष्मण शिंदे, राजाराम पवार, अभिषेक चव्हाण, शरद भोसले, आनंद पवार, सागर शिंदे, केदार तोडकर, धनंजय गडदे, लखन आवटे, सचिन बिराजदार, अमित कोळी, बसवराज भोळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चौकट : उत्कृष्ट नियोजनाची झलक
धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतिश पवार यांच्या कुशल नियोजनामुळे ही मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध व सांस्कृतिक वातावरणात पार पडली. समाजात ऐक्य, संस्कार आणि शिवप्रेम जागृत करण्याचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. उत्सव कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण या मिरवणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्याने शिवप्रेमींकडून आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button