गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

वर्धापन दिन विशेष

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी) :
“अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त”, “सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय”, “श्री अन्नपूर्णा देवी” आणि “श्री लक्ष्मीनारायण” यांच्या जयघोषात श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा महोत्सव बुधवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राज्यासह परराज्य व विदेशातून आलेल्या लाखो स्वामीभक्तांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. संपूर्ण अन्नछत्र परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता. भक्तांच्या सोयीसाठी महाप्रसाद, निवास, पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप आणि श्री गुरूपूजा यांसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शेखर निकम, शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त मंडळ, सेवेकरी, क्रियाशील सभासद, विविध समित्यांचे पदाधिकारी आणि शेकडो स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

गेल्या दहा दिवसांपासून धर्मसंकीर्तन, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांनी गुरुपौर्णिमा महोत्सवाची रंगत वाढविली होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद वितरणासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. विधिवत पूजा मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वंभर पुजारी, संजय कुलकर्णीसोमकांत कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले.

वर्षभरात ५ हजार भक्तांनी केले रक्तदान

अन्नछत्र मंडळात आयोजित विविध रक्तदान शिबिरांमधून गेल्या ३६० दिवसांत सुमारे ५ हजार स्वामीभक्तांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.

चोख पोलीस बंदोबस्त

गुरुपौर्णिमा आणि वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पवार यांनी मंदिर व अन्नछत्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

वाहतूक व पार्किंगचे उत्कृष्ट नियोजन

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन न्यासाने वाहतूक आणि पार्किंगचे सुयोग्य नियोजन केले. मैंदर्गी रस्त्यावरील प्रवेश व निर्गमन व्यवस्था स्वतंत्र केल्याने वाहतूक सुरळीत राहिली आणि भाविकांना कोणतीही गैरसोय झाली नाही.

लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज दोन्ही वेळा मोफत महाप्रसाद दिला जातो. दररोज २५ हजारांहून अधिक भाविक तर गुरुपौर्णिमा, गुरुवार, एकादशी, संकष्टी यांसारख्या विशेष दिवशी एक लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

सातासमुद्रापार पोहोचले अन्नछत्र मंडळाचे कार्य

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंड तसेच विदेशातून आलेल्या स्वामीभक्तांनी गुरुपौर्णिमा व वर्धापन दिनानिमित्त अन्नछत्र मंडळाला भेट देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

६० कोटींचे अत्याधुनिक महाप्रसादगृह उभारणीच्या मार्गावर

अन्नछत्र मंडळाच्या नव्या महाप्रसादगृहाचे बांधकाम वेगाने सुरू असून सध्या तिसऱ्या मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या वातानुकूलित इमारतीवर ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. एकावेळी २,५०० भाविकांसाठी भोजन व्यवस्था आणि ५ हजार भाविकांसाठी प्रतीक्षागृह, आधुनिक स्वयंपाकगृह, चपाती मशिन्स, डिश वॉशर, धान्य कोठार व अग्निशामन यंत्रणा अशा अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात असणार असून त्याचा अंदाजित खर्च सुमारे ६० कोटी रुपये आहे.

समाजोपयोगी उपक्रमही उल्लेखनीय

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगिरांसाठी खुराक योजना, रक्तदान शिबिरे यांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. यंदाच्या पंढरपूर वारीदरम्यान पोलिसांसाठी अन्नधान्य, उपवासाचे साहित्य आणि पिण्याच्या पाण्याचे ५०० जार उपलब्ध करून देत मंडळाने समाजसेवेचा आणखी एक आदर्श निर्माण केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button