३ लाखात बी.काॅम ची डिग्री..? पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात बनावट डिग्री रॅकेट चा पर्दाफाश ; एका रिक्षाचालकामुळे प्रकार उघडकीस

पुणे (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाचे बनावट पदवी प्रमाणपत्र पैसे घेऊन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील कर्मचारीच या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने तीन सदस्यांची सत्यशोधन समिती नियुक्त केली आहे.
रिक्षाचालक, महेश कदम हे गेल्या वर्षी विद्यापीठात मुलाच्या प्रवेशाच्या चौकशीसाठी गेले होते. त्यांना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात भेटलेल्या कर्मचाऱ्याने कदम यांना ‘तीन लाख रुपयांत वाणिज्य शाखेचे पदवी प्रमाणपत्र (बी. कॉम.) देतो,’ असे सांगितले. मात्र, कदम यांनी आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितल्यावर दीड लाख रुपयांत व्यवहार ठरला. मात्र, मिळालेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय कदम यांना आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबाबत विद्यापीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या बाबत कदम म्हणाले, ‘मुलाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या चौकशीसाठी विद्यापीठात गेलो असताना तेथील एका कर्मचाऱ्याने तीन लाख रुपयांत पदवी प्रमाणपत्र देता येत असल्याचे सांगितले. हा प्रकार काय आहे, या बाबत कल्पना नव्हती. आर्थिक परिस्थिती नसल्याने दीड लाख रुपयांत पदवी प्रमाणपत्र देण्याचे ठरले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० हजार रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये असे ७० हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी पदवीच्या पहिल्या दोन वर्षांची एका महाविद्यालयाच्या नावे गुणपत्रके तयार करून दिली.
पदवी प्रमाणपत्राबाबत विचारल्यावर बी.कॉम.च्या प्रमाणपत्राची डिजिटल प्रत दिली. त्यावर पुणे विद्यापीठ असा उल्लेख होता. विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा उल्लेख का नाही, असे विचारल्यावर त्यांनी प्रमाणपत्रात बदल करून देऊन उर्वरित रकमेची मागणी केली. त्यामुळे या प्रकाराबाबत शंका आल्याने सामाजिक कार्यकर्ते धम्मरत्न गायकवाड यांना या बाबत माहिती दिली. त्यांच्या मदतीने विद्यापीठात लेखी तक्रार केली.’
दरम्यान, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका आणि पदवी तयार करून दिली, असा आरोप असणारी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची सत्यता आणि व्याप्ती तपासण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे स्पष्टीकरण प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिले.
सत्यशोधन समितीमार्फत चौकशी
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे एका विशिष्ट विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र, पदवीसंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीत विद्यापीठाच्या नावाने गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे बनावट तयार करण्यात आल्याचे, संबंधित विद्यार्थ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून, सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी कुलगुरूंच्या आदेशान्वये सत्यशोधन समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील तथ्ये, शिफारशींनुसार पुढील आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी अधिकृत प्रकटनाद्वारे दिली.


