गावगाथा

भरल्या घरातील मुलेही अनाथच : डॉ. सुनीलकुमार लवटे

बालकुमार साहित्य संस्थेतर्फे पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्काराने डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा गौरव

भरल्या घरातील मुलेही अनाथच : डॉ. सुनीलकुमार लवटे
बालकुमार साहित्य संस्थेतर्फे पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्काराने डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा गौरव
पुणे : देशातील शहरी भागात भौतिक समृद्धी येत असताना पालक हे मालक म्हणून जन्माल येत आहेत. पालकांनी पुस्तके वाचायचे टाकल्यामुळे मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी मोबाईल आले आहेत. त्यामुळे खरे गुन्हेगार पालक आहेत. सुखसमृद्धी वाढली तरी भरल्या घरातील मुले अनाथच आहेत. प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले तर समाजातील प्रश्न सुटतील, असा आशावाद ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य यांच्या नावाने देण्यात येत असलेला कार्यगौरव पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे यांना आज (दि. ९) ज्येष्ठ रसिकाग्रणी उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. लवटे बोलत होते. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे मंचावर होते.
वंचित बालकांसाठी काम करणे ही निजखूण मनाशी बांधून कार्याला सुरुवात केली असे सांगून डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळीही समाजात स्वास्थ्य नव्हते, भविष्यातही नसणार अशी माझी ठाम धारणा आहे. वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांची पूर्वी जशी परस्थिती होती तशीच आजही आहे. समाज सुशिक्षित, संस्कारित, प्रगल्भ झाला आहे का असा जर प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. समाजच खऱ्या अर्थाने वंचितांचा गुन्हेगार आहे. समाजजीवन सर्व अंगांनी उद्‌ध्वस्त होताना दिसत आहे. अल्पवयीन मुले आणि मुलींचे गायब होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अपंग पिढी घरा-घरात वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मानवाधिकारासंदर्भातील कायदे सरकारने अनिच्छेनेच केले असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.
विनोद शिरसाठ म्हणाले, ‘समग्र तर्कतीर्थ’ आणि ‘आत्मस्वर’ या डॉ. लवटे यांच्या साहित्यातून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख होते. त्यांचे जगणे समजून घेण्यासाठी हे साहित्य उपयुक्त आहे. उल्हास पवार यांनी डॉ. लवटे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी आपल्या लिखाणातून वैचारिक समृद्धी केली असल्याचे सांगितले.
संस्थेच्या माध्यमातून मुलांवर भाषेचे, लेखनाचे संस्कार केले जात असल्याचे माधव राजगुरू यांनी संस्थेची माहिती विशद करताना सांगितले. कार्यक्रमाची भूमिका आणि मानपत्राचे वाचन प्रसाद भडसावळे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार अनिल कुलकर्णी यांनी केला तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय ऐलवाड यांनी केले.
फोटो ओळ : बालकुमार संस्था आयोजित पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) अनिल कुलकर्णी, विनोद शिरसाठ, उल्हास पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे, माधव राजगुरू, प्रसाद भडसावळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button