मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये रास्ता रोको; वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा
अक्कलकोट (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अक्कलकोट–सोलापूर राजमार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे संयोजक तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, या आग्रही मागणीसाठी उड्डाणपुलासह पाच प्रमुख मार्ग एकाच वेळी रोखण्यात आले. आंदोलनामुळे सोलापूर, कर्नाटक तसेच मराठवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, तर महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. यावेळी नगरसेवक संजय मोरे (मैंदर्गी), शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार, शिवप्रतिष्ठानचे वरुण शेळके, गोपीचंद लोंढे, वंदना टोणपे आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
आंदोलनावेळी अमोलराजे भोसले, सुरेश सूर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण घाटगे, तम्मा शेळके, मनोज निकम, अण्णासाहेब सुरवसे, सुधाकर गोंडाळ, प्रथमेश पवार, बालाजी पाटील, आतिष पवार, महेश दणके, योगेश पवार, वैभव मोरे, शितल फुटाणे, दयानंद काजळे, गोविंद शिंदे, राजाभाऊ शिंदे, भरत राजेगावकर, अक्षय मोरे, आकाश शिंदे, सरपंच नितीन मोरे, सरपंच दिलीप कदम, सरपंच राम मातोळे, संभाजी ब्रिगेडचे दयानंद काजळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष योगेश पवार, दिलीप काजळे, दशरथ गायकवाड, मनोज इंगवले, समाधान मोरे, निशांत कवडे, प्रसाद मोरे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर भोसले, गोपीचंद लोंढे, प्रदीप सुरवसे, उमेश साळुंखे, रोहन जगताप, अंकुश मोरे, नाना काजळे, प्रवीण देशमुख, सिद्धेश्वर मोरे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!