मोहिते-पाटील यांच्या अक्कलकोट दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण
विविध राजकीय घटकांशी भेटीगाठी; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली सक्रियता चर्चेत

मोहिते-पाटील यांच्या अक्कलकोट दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण
विविध राजकीय घटकांशी भेटीगाठी; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली सक्रियता चर्चेत
अक्कलकोट (प्रतिनिधी) : माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि राजकीय घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या अलीकडील भेटीगाठी या केवळ सदिच्छा भेटी आहेत की आगामी राजकीय घडामोडींची पूर्वतयारी, याबाबत तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेषतः आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढलेल्या सक्रियतेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका मानला जातो. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांच्या वाढलेल्या संपर्कामुळे आगामी काळातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नेत्यांमधील नाराजी, विविध गटांतील मतभेद तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या राजकीय संधींचा अंदाज घेत मोहिते-पाटील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सक्रिय करीत असल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संपर्क वाढवत स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील गटाचीही राजकीय सक्रियता वाढताना दिसत असल्याने आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहिते-पाटील कुटुंबाचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये स्थानिक नेत्यांशी वाढविला जाणारा संपर्क आणि कार्यकर्त्यांशी साधला जाणारा संवाद यामुळे राजकीय शक्तिसंतुलनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, आनंद तानवडे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी तसेच शेरीकर बंधू यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. विविध राजकीय पक्ष व गटांतील नेत्यांशी झालेल्या या भेटींमुळे अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक, त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांच्या या भेटीगाठींचे नेमके राजकीय फलित काय असेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
चौकट : स्वर्गीय प्रदीप जगताप यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तालुक्यातील गोगाव येथे जाऊन स्वर्गीय प्रदीप जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रदीप जगताप हे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली.



