*सचिन बेंडभर यांच्या हत्तीची सहल या काव्यसंग्रहास पुरस्कार*
पुणे दि. 9 (प्रतिनिधी)-
शिक्षक संजीवनी या मासिकातर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीला पुरस्कार दिले जातात. यावर्षी हा पुरस्कार संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सचिन बेंडभर यांच्या हत्तीची सहल या बाल काव्यसंग्रहास उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार प्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते पुणे येथील पत्रकार भवन येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक दिलीप फलटणकर, स्वाती महालंक, माधुरी गोखले, भालचंद्र कुलकर्णी, अविनाश सकुंडे, दिलीप गरुड, श्रुती कुलकर्णी, संपादक देविदास लिमजे आणि कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे येथील शिक्षक संजीवनी मासिकातर्फे मराठी साहित्यातील बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांच्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. यावर्षी बालसाहित्य विभागात पिंपळे जगताप ता.शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या हत्तीची सहल या संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या बालकाव्यसंग्रहाला प्रसिद्ध कवी व साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार विजेते साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते पुणे येथील पत्रकार भवन येथे सकाळी 10.00 वाजता प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह ,प्रशस्तिपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2026 सालचा हा पहिलाच सन्मान असून निवड समितीने एकमताने या काव्यसंग्रहाची निवड केली आहे.
हत्तीची सहल या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर पाटील यांचा हत्तीची सहल हा काव्यसंग्रह!
संस्कृती प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार प्रतीक काटे यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिका संगीता बर्वे यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. तर बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!