वास्तवाचे भान ठेवून तथ्याधारित लेखन करा –आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी
आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक-नवकवी कार्यशाळेचे उद्घाटन

वास्तवाचे भान ठेवून तथ्याधारित लेखन करा –आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी
आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक-नवकवी कार्यशाळेचे उद्घाटन

सोलापूर : इतिहास असो वा कविता, कोणताही साहित्यप्रकार हाताळताना लेखकाला वास्तवाचे भान असणे आवश्यक आहे. पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्यांच्या आधारावर लेखन करावे, असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक व नवकवींसाठी रविवारी (दि. ४) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी बाराव्या शतकातील श्री शिवयोगी सिद्धरामांनी वचन साहित्याच्या माध्यमातून मांडलेल्या समरसतेच्या विचाराचा उल्लेख केला. सोलापूर शहर हे देशातील समरसतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्वातंत्र्यानंतर साहित्याच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड, महापुरुषांची बदनामी तसेच गौरवशाली परंपरेचे विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अशा पार्श्वभूमीवर नवलेखक आणि नवकवींनी तथ्यात्मक व वास्तववादी लेखनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रातील गौरवशाली परंपरा जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.
साहित्याने जगण्याची धिटाई द्यावी
प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, साहित्यिकांचे कळप तयार झाल्याची खंत वाटते. साहित्याने माणसाला जगण्याची आणि मरण्याची धिटाई द्यायला हवी. नव्या पिढीला सत्त्व आणि स्वत्त्वाची जाणीव करून द्यायला हवी. समरसता साहित्य परिषदेने माणूस म्हणून जगण्याची भूमिका मांडत आपले वेगळे अस्तित्व जपले आहे.
प्रास्ताविकात डॉ. गजानन होडे यांनी समरसता साहित्य परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला.
‘जेन झी’ला कालिदासाचेही आकर्षण असू द्या!
मोबाईल आणि रील्सच्या विश्वात अडकलेल्या ‘जेन झी’साठी समरसता साहित्य परिषदेने नवलेखक व नवकवींसाठी आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. ‘जेन झी’ला पाश्चात्त्य लेखक आणि त्यांच्या साहित्याचे आकर्षण असले तरी त्यांनी कालिदासाला विसरू नये. भारतीय साहित्य आणि ज्ञानसंपदेत जगाला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताची ज्ञानसंपदा आणि पारंपरिक शिक्षणपद्धती आक्रमकांनी व वसाहतवाद्यांनी नष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, सहकार्यवाह सुहास घुले, सोलापूर शाखाध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, सुनील ढेंगळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, जनता बँकेच्या संचालिका गौरी आमडेकर, आनंद धडके, दुर्गा जोशी, मदन जवळेकर, अमृता कल्याणी, रुपा कुताटे, विजयकुमार सोनवणे आदी उपस्थित होते.
श्रद्धा रोडगे व सुप्रिया लिमये यांनी गीत गायिले. दुर्गा जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर ऐश्वर्या धडके यांनी आभार मानले.



