क्रॉस कंट्री स्पर्धेत सी.बी. खेडगीज महाविद्यालयाला दुहेरी मुकुट
महिला संघ विजेता; पुरुष संघाला उपविजेतेपद
अक्कलकोट, दि. ५ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२६ च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत अक्कलकोट येथील सी.बी. खेडगीज महाविद्यालयाने दमदार कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद, तर पुरुष संघाने द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद पटकावले.
सी.बी. खेडगीज महाविद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते झाले. यावेळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ क्रीडा परिषदेचे चेअरमन डॉ. नितीन मोटे, क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. संतोष गवळी, निवड समिती व पात्रता समितीतील प्राध्यापक तसेच विविध महाविद्यालयांचे क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीत पुरुष गटात ईश्वर झिरवळ याने प्रथम, दाजी हुबाळे याने द्वितीय, तर दुर्गेश अहिरे याने तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटात सानिका आयवळे, प्रीती चव्हाण आणि अहिल्या काळे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनुक्रमे अव्वल क्रमांक पटकावले.
सर्वसाधारण संघविजेतेपदाच्या पुरुष गटात डी.बी.एफ. दयानंद कॉलेज – प्रथम, सी.बी. खेडगीज कॉलेज- द्वितीय, तर संगमेश्वर कॉलेज- तृतीय ठरले. महिला गटात खेडगीज कॉलेज – प्रथम, पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज- द्वितीय, तर संगमेश्वर कॉलेज- तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात डॉ. नितीन मोटे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी खेडगीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. किशोर थोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एल. पी. हिंडोळे यांनी केले, तर आभार स्पर्धेचे संयोजक डॉ. डी. एम. बिराजदार यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. रवी कुनाळे, डॉ. समर्थ मनुकर, डॉ. मल्लिकार्जुन पाटील, प्रा. बाबासाहेब वाघचौरे, विशाल व्हनमाने, डॉ. रामकृष्ण नागटिळक, अनिल परमार, सोहेल शेख व सुधीर राठोड यांनी परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!