गावगाथा

वागदरीच्या शाळांना किर्लोस्कर कंपनीचा सेवाभावी हात संतोष गुमास्ते व ऋषिकेश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुला-मुलींच्या शाळांचे संपूर्ण रंगकाम

शैक्षणिक उपक्रम

वागदरीच्या शाळांना किर्लोस्कर कंपनीचा सेवाभावी हात
संतोष गुमास्ते व ऋषिकेश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुला-मुलींच्या शाळांचे संपूर्ण रंगकाम
वागदरी : आपल्या जन्मभूमीशी असलेले ऋणानुबंध जपत सामाजिक बांधिलकी जपणारे वागदरी गावचे सुपुत्र तथा किर्लोस्कर कंपनीचे प्रमुख श्री. संतोष गुमास्ते यांच्या पुढाकारातून व किर्लोस्कर कंपनीचे श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांच्या सहकार्याने वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळांचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले आहे. या सेवाभावी उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वाचा अवलंब करत समाजसेवेला प्राधान्य देणारे संतोष गुमास्ते यांचे आपल्या गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शाळेच्या रंगकामाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती देविदास शिंदे यांनी गुमास्ते यांच्याकडे विनंती केली होती.
यावेळी गुमास्ते यांनी “ही शाळा माझी आहे” अशी भावना व्यक्त करत कंपनीच्या माध्यमातून शाळेचे रंगकाम करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर काही अडचण आली तरी स्वखर्चाने शाळेचे रंगकाम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यांच्या या भूमिकेतून आपल्या गावाविषयी आणि शाळेविषयी असलेले निस्वार्थ प्रेम दिसून आले.
दरम्यान, सोलापूर येथील किर्लोस्कर कंपनीत कामाबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यानंतर कंपनीचे श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांनीही वागदरीशी असलेल्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. वागदरीतील कुलकर्णी परिवाराशी असलेल्या संबंधांची आठवण सांगत त्यांनीही शाळेचे रंगकाम करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
कंपनीने दिलेल्या शब्दानुसार मुला-मुलींच्या दोन्ही शाळांमधील वर्गखोल्या तसेच बाहेरील परिसरातील भिंतींचे दर्जेदार पद्धतीने संपूर्ण रंगकाम करून दिले आहे. त्यामुळे शाळेचा परिसर अधिक आकर्षक व प्रसन्न झाला असून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.
या सेवाभावी उपक्रमाबद्दल दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व पालक यांनी श्री. संतोष गुमास्ते व श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कामाच्या पूर्ततेसाठी वागदरीचे सुपुत्र श्री. शिवपुत्र चोळळे सर आणि श्री. विजयकुमार घोळसगाव यांचेही मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दलही शाळा प्रशासन व ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जन्मभूमीशी नाते केवळ आठवणींत न ठेवता आपल्या गावासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याची प्रेरणादायी कृती म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button