*राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास व अण्णा भाऊ साठे साहित्यावरील पाच ग्रंथांचे प्रकाशन*
*“फुलांपेक्षा पुस्तके भेट द्या; फुले कोमेजतात, पण पुस्तकांतील विचार दीर्घकाळ जिवंत राहतात” — राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

*राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास व अण्णा भाऊ साठे साहित्यावरील पाच ग्रंथांचे प्रकाशन*
*“फुलांपेक्षा पुस्तके भेट द्या; फुले कोमेजतात, पण पुस्तकांतील विचार दीर्घकाळ जिवंत राहतात” — राज्यपाल जिष्णु देव वर्मा*
*मुंबई दि.०५ :* “लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम असून महान व्यक्तींचे विचार, मूल्ये आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात साहित्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात अनेक घटना घडतात आणि अनेक व्यक्ती आपल्या कार्याने महत्त्वाच्या ठरतात. मात्र काळाच्या ओघात घटना विस्मृतीत जातात. तशा व्यक्तीही लोकांच्या स्मरणातून दूर होतात. परंतु लेखक आणि त्याचे साहित्य काळाच्या विस्मृतीवर मात करते. लेखकाने शब्दबद्ध केलेले साहित्य चिरंतन स्मरणात राहते. म्हणूनच व्यक्ती आणि घटना विसरल्या जाऊ शकतात; पण त्यांना शब्दरूप देणारे साहित्य समाजाच्या सामूहिक स्मृतीत सदैव जिवंत राहते.भारतातील संत परंपरा ही केवळ अध्यात्माची परंपरा नव्हती, तर ती समानतेची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती. या परंपरेचे योगदान इतिहासात अपेक्षित प्रमाणात नोंदले गेलेले नाही,”संत रविदास महाराज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा व्यापक पट उलगडणाऱ्या पाच महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते लोकभवन, मुंबई येथे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू) लिखित ‘संत रविदास म्हणे!’ तसेच मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन आणि चिंतन’, ‘अण्णा भाऊ साठे : आकलन आणि आस्वाद’,डॉ.धनंजय भिसे आणि डॉ.संतोष रोडे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) आणि डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. माणिक सोनावणे व डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : अ ट्रान्सनॅशनल लिटररी लेगसी’ या पाच ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुढे म्हणाले “साहित्य हे विविध भाषा, प्रदेश आणि पिढ्यांना जोडणारा सेतू असल्याचे सांगत ते म्हणाले की, उत्तम साहित्य केवळ वाचकाचे मनोरंजन करत नाही, तर त्याच्या मनाला आणि हृदयाला स्पर्श करून त्याच्या विचारांना नवी दिशा देते. संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करताना राज्यपालांनी समाजात फुलांऐवजी पुस्तके भेट देण्याची संस्कृती रुजविण्याचे आवाहन केले. “फुले कोमेजतात; मात्र पुस्तकांतील विचार दीर्घकाळ जिवंत राहतात आणि समाजावर प्रभाव निर्माण करतात,” असे ते म्हणाले.लेखक, संशोधक आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक वारशाचे जतन करणे आणि तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.
या प्रसंगी पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विष्णू वझे, कैलास सोनटक्के, हेमंत हरहरे, निलेश गद्रे, रविंद्र गोळे,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (आर्टी) व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आर्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, डॉ. बळीराम गायकवाड, नागेश धोंडगे, विलास लांडगे, नागेश पाटील, सागर शिंदे, सचिन राऊत, अनिल सौंदाडे , समीर पाचारणे, राहूल कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संत रविदासांच्या समतेच्या विचारांपासून अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या साहित्यापर्यंतचा वैचारिक प्रवास अधोरेखित करणारे हे पाच ग्रंथ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषिक वाचकांसाठी महत्त्वपूर्ण साहित्यसंपदा ठरणार असून, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या विचारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आहेत.या प्रकाशन सोहळ्यामुळे संतपरंपरेतील समतेचा विचार आणि अण्णा भाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी साहित्याचा संवाद एका व्यापक राष्ट्रीय संदर्भात पुढे आला, ही या कार्यक्रमाची विशेष ठळक बाब ठरली.
HTML img Tag
याप्रसंगी डॉ. बळीराम गायकवाड यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित प्रकाशित करण्यात आलेल्या चारही ग्रंथांची संक्षिप्त ओळख करून दिली. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य, त्यांचे सामाजिक व साहित्यिक विचार, त्यांच्या साहित्याची व्यापकता तसेच अण्णा भाऊंच्या साहित्यावरील संशोधनाच्या विविध पैलूंचे उपस्थितांना अभ्यासपूर्ण अवलोकन करून दिले. त्यांच्या विवेचनातून अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे साहित्यिक नसून वंचित, श्रमिक आणि उपेक्षितांच्या जीवनाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारे व्यापक मानवतावादी साहित्यिक असल्याचे अधोरेखित झाले.
त्यानंतर ‘संत रोहिदास म्हणे!’ या ग्रंथाच्या लेखिका श्रीमती स्नेहलता स्वामी यांनी लेखकाच्या भूमिकेतून ग्रंथलेखनामागील प्रेरणा, संत रोहिदास महाराजांचे विचार, त्यांचे सामाजिक तत्त्वज्ञान आणि समतेचा संदेश याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि नेटके सूत्रसंचालन राज्यपाल कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे (lAS) यांनी केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि साहित्यिक उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर, लेखक, प्रकाशक, उपस्थित साहित्यिक, अभ्यासक आणि निमंत्रितांचे आभार निलेश गद्रे यांनी मानले.



