गावगाथा

आळगीतील ऊसाच्या शेतात तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; २११ किलो १०० ग्रॅम गांजा, २४० झाडे जप्त

आळगीतील ऊसाच्या शेतात तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त
अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; २११ किलो १०० ग्रॅम गांजा, २४० झाडे जप्त
अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील ऊसाच्या शेतातून तब्बल १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण २४० गांजाची झाडे आढळून आली असून त्यामध्ये २१० जिवंत तर ३० वाळलेल्या झाडांचा समावेश आहे. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते.
२८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशांत बधे व त्यांच्या पथकाचे कर्मचारी करजगी दुरक्षेत्र परिसरात गस्त घालत असताना आळगी येथील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृश्य वनस्पतींची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून पाहणी केली.
पोलिसांच्या पाहणीत ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी सुमारे १२ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. पंचनाम्याअंतर्गत ही झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५३१/२०२६ अन्वये अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button