Goa : म्हापसा येथे ‘राष्ट्र संकल्प’चा निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वी

गोवा (प्रतिनिधी ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘राष्ट्र संकल्प’च्या वतीने म्हापसा येथील तार नदीजवळ राबविण्यात आलेला निर्माल्य संकलन उपक्रम यंदाही उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. गेल्या वर्षापासून गोव्यातील म्हापसा शहरात हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, गणेश विसर्जनासाठी नदीकाठी येणाऱ्या भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता संकलन केंद्रावर जमा करावे, यासाठी स्वयंसेवकांनी दिवसभर जनजागृती केली. भाविक, गणेश मंडळे आणि नागरिकांनीही उपक्रमाला सहकार्य करत निर्माल्य संकलन केंद्रावर जमा केल्याने नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यास मदत झाली.
या उपक्रमासाठी म्हापसाचे रहिवासी प्रशांत राऊत, सुभाष नागवेकर आणि निखिल कळंगुटकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी संकलित झालेल्या निर्माल्याचे वर्गीकरण तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. संकलित केलेल्या साहित्यामध्ये नैसर्गिक निर्माल्य, प्लास्टिक आणि इतर कचरा असे वर्गीकरण करण्यात आले. नैसर्गिक निर्माल्य कंपोस्टसाठी, तर प्लास्टिक व इतर साहित्य पुनर्वापरासाठी देण्यात आले. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असला, तरी त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे, या उद्देशाने ‘राष्ट्र संकल्प’च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाविक, गणेश मंडळे आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे उपक्रमाला यश मिळाले. ‘गणरायाची सेवा आणि पर्यावरणाचे रक्षण हीच खरी आराधना’ या संदेशातून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न ‘राष्ट्र संकल्प’च्या स्वयंसेवकांनी केला.

