पावसाची आस संपेना ; टँकरच्या पाण्यावर तूर वाचवण्याची वागदरी येथील शेतकऱ्याची धडपड …
उरलेली तूर वाचवण्यासाठी शेतकऱ्याची टँकरने पाणी विकत घेऊन धडपड

वागदरी : गेल्या काही महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने अक्कलकोट तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आशा सोडलेली नाही.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी गुंडप्पा धाय्ये यांनी आपल्या शेतातील उरलेली तूर वाचवण्यासाठी चक्क बाहेरून टँकरने पाणी विकत घेतले आहे. पिकाला पाणी मिळावे आणि हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ नये, यासाठी ते स्वतःच्या शेतात टँकरचे पाणी आणून तुरीला पाणी देत आहेत.
पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागलेले डोळे, कोरडी पडलेली जमीन आणि पिके वाचवण्यासाठी पाण्यासाठी करावी लागणारी धडपड… हे चित्र सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची व्यथा सांगत आहे.
पाऊस नाही, विहिरींना पाणी नाही; तरीही शेतकरी हार मानायला तयार नाही. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाया जाऊ नये म्हणून स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ गुंडप्पा धाय्ये यांच्यावर आली आहे.
शेतकऱ्याच्या या धडपडीमागे केवळ पीक वाचवण्याची धडपड नाही, तर संपूर्ण वर्षाची आशा, मेहनत आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार वाचवण्याची आस आहे.
पाऊस कधी येईल याची शाश्वती नाही; पण शेतकऱ्याची आपल्या मातीतल्या पिकांवरील माया अजूनही संपलेली नाही.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!