गावगाथा

*महावितरणच्या तारांमधून शॉर्टसर्किट; शिरवळवाडी येथील महिला शेतकऱ्याचा २.२५ एकर ऊस जळून खाक!*

*नुकसानभरपाईसाठी ग्रामस्थांचे रस्ता आंदोलन; पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी*

*महावितरणच्या तारांमधून शॉर्टसर्किट; शिरवळवाडी येथील महिला शेतकऱ्याचा २.२५ एकर ऊस जळून खाक!*

*नुकसानभरपाईसाठी ग्रामस्थांचे रस्ता आंदोलन; पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी*

शिरवळवाडी /प्रतिनिधी
महावितरणच्या विद्युत तारांमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शिरवळवाडी येथील महिला शेतकरी लक्ष्मीबाई मल्लिकार्जुन मारलभावी यांच्या गट क्रमांक ७३/२/अ मधील तब्बल २.२५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आधीच शेतीतील विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
महावितरणच्या विद्युत तारांमधून शॉर्टसर्किट झाल्याने उसाला आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. आगीमध्ये उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ऊस लागवड, खते, औषधे, पाणी आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने नुकसानग्रस्त महिला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.
पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
या घटनेची तातडीने दखल घेऊन जळालेल्या उसाचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा, नुकसानीचे योग्य मूल्यमापन करावे आणि महावितरणकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्ता आंदोलन केले.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
एकीकडे शेतीचा वाढता खर्च आणि दुसरीकडे नैसर्गिक व इतर संकटांमुळे शेतकरी अडचणीत असताना, विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे “दुष्काळात तेरावा महिना” अशी परिस्थिती लक्ष्मीबाई मारलभावी यांच्यावर ओढवली आहे.
संबंधित विभागाने घटनेची तातडीने चौकशी करून पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याला नियमानुसार योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शिरवळवाडी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रशासन आणि महावितरण या प्रकरणाची किती लवकर दखल घेते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

चौकट
दुर्घटनेचे संभाव्य कारण हे
वागदरी अॅग्रीकल्चर फीडरची ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टी-आकाराच्या रचनेत बसविण्यात आलेली असून, त्या ठिकाणी कट पॉइंट आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी अंदाजे ३:४५ वाजता कट पॉइंटवरील जंप जळाला. त्यामुळे विद्युत ठिणग्या पडून शेतातील अंदाजे २ एकर ऊस पिकाला आग लागून नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कनिष्ठ अभियंता
वागदरी विभाग

चौकट
दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी अंदाजे ३:४५ वाजता, माझ्या शेताजवळून गेलेल्या महावितरणच्या ११ केव्ही वागदरी अॅग्रीकल्चर फीडरवरील विद्युत वाहिनीच्या कट पॉइंटजवळील जंप जळून ठिणग्या पडल्यामुळे माझ्या शेतातील अंदाजे २ एकर ऊस पिकाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लक्ष्मीबाई मल्लिकार्जुन मारलभावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button