गावगाथा

पुस्तकांशी मैत्री; विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी! रमणबाग शाळेतील वर्गवाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम

दिन विशेष

रमणबाग शाळेतील वर्गवाचनालयाचा प्रेरणादायी प्रयोग

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यभर ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    


शाळेतील वर्गशिक्षिका प्रज्ञा करडखेडकर यांनी त्यांच्या आई प्रा. सौ. विजया करडखेडकर यांच्या नावाने वर्गातच वर्गवाचनालय सुरू केले. या वाचनालयाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक माधव राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माधव राजगुरू म्हणाले की, मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे अत्यंत गरजेचे आहे. वाचनामुळे विचार समृद्ध होतात, भाषेवर प्रभुत्व मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. शाळेच्या वर्गातच वाचनालय सुरू करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
यावेळी मराठी भाषा, साहित्य, वाचनपरंपरा आणि वाचनाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
शाळेतील शिक्षक रवींद्र सातपुते यांनी यापूर्वीच आपल्या वर्गात वर्गवाचनालय सुरू केले आहे. कार्यक्रमानंतर या वर्गवाचनालयास भेट दिली असता, वर्गातील एका कोपऱ्यात पुस्तकांनी भरलेली दोन कपाटे दिसली. विद्यार्थ्यांनी वाचनासाठी नेलेल्या पुस्तकांची व्यवस्थित नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही होती. कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक कोणत्या दिवशी घेतले आणि कधी परत केले, याची नोंद त्यात केली जात होती.
विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडेही वाचलेल्या पुस्तकांची स्वतंत्र नोंदवही होती. त्यामध्ये पुस्तकाचे नाव, लेखक, विषय, आशय तसेच पुस्तकातील आवडलेला भाग याची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेली होती.
हा उपक्रम पाहिल्यानंतर ‘आजची मुले पुस्तके वाचत नाहीत’ या समजुतीला छेद देणारे सकारात्मक चित्र समोर आले. मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या मोहजालात वाचन कमी होत असल्याची चर्चा सुरू असताना रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांचा हा वाचनप्रयोग निश्चितच दिलासादायक आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    


वर्गवाचनालय ही संकल्पना प्रत्येक शाळेने स्वीकारली, तर विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकही दिसेल आणि वाचनसंस्कृतीला नवी उभारी मिळेल. रमणबाग शाळेतील हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी व अनुकरणीय ठरणारा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button