शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करा : मनोहर मोहरे
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांकरीता शुभचिंतन सोहळा

शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करा : मनोहर मोहरे

पुणे प्रतिनिधी
फुलवडे ( ता .आंबेगाव ) येथील औदुंबरेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीरंग गभाले मराठी माध्यामिक विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांकरीता शुभचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून याच फुलवडे गावचे सुपूत्र लेखक व कवी मनोहर मोहरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्वतः काहीतरी कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे तरच तुम्ही या स्पर्धेत टिकाल असा मार्मिक सल्ला दिला . दहावीच्या शुभचिंतन सोहळ्यात बोलताना त्यांनी वाचनाचे महत्त्व , स्व :ताचा लेखन प्रवास तसेच इतर प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले . दहावी , बारावी हे आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत , म्हणूनच विद्यार्थी दशेत चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवा , व्यक्तिमत्वावर डाग पडणार नाही याची काळजी घ्या . असा सल्ला वडिलकीच्या नात्याने दिला .
यावेळी संस्थेचे सचिव चिंतामण महाराज भारमळ यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले व परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. न्यु इंग्लीश स्कूल गोहे खुर्द चे मुख्याध्यापक औदुंबर सरवदे ,मेजर नारायण हिले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी भावूक होऊन मनोगत व्यक्त केले . ज्या शाळेत शिकलो , खेळलो , बागडलो त्याच शाळेला सोडून जाताना अनेक विद्यार्थ्यांच्या पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या . दहावीच्या विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून शाळेला भिंतीवरील घड्याळे भेट दिली .
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार विजयराव गभाले , संचालक गंगाराम नंदकर , मुख्याध्यापक अशोक भवारी , शिक्षक वायकर सर , राहुल मोहरे , भीमसेन हिले ,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार लोहकरे , विठठल गभाले , संदीप नंदकर ,तसेच ग्रामस्त ,पालक आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन इयत्ता १० वी च्या विद्यार्थीनींनी केले उपस्थितांचे आभार ज्येष्ठ शिक्षक भरत अनंत यांनी मानले . कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले .
