देशाच्या पर्यटन विकासामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयातील भूगोल विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने चर्चा

अक्कलकोट, दि.१२- देशाच्या पर्यटन विकासामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी
महाविद्यालयातील भूगोल विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशांतर्गत पर्यटनाची संधी आणि लाइफ सायन्स या दोन विषयांच्या
राष्ट्रीय चर्चासत्राच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुभाष धरणे हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, संस्थेचे अध्यक्ष
बसलिंगप्पा खेडगी, उपाध्यक्ष अशोक हारकुड,संचालक अडहोकेट अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, ज्योती धरणे, प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट, माजी प्राचार्य के. एम. जमादार, मंद्रुपचे प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे उपस्थित होते.

कुलगुरू फडणवीस पुढे म्हणाले, जगात दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे प्रचंड प्रमाणावर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली. त्याचे दृश्य परिणाम विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत आहेत. पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यामुळे लोकांना पर्यटन क्षेत्राची माहिती होऊन विविध क्षेत्रांना भेटी देण्यामध्ये लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जीआयएस, जीपीएस तंत्रज्ञानामुळे तर पर्यटकांना सहज माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे आज देशातीलच नव्हे तर जगातील सर्व पर्यटनक्षेत्रे कैद झाले. परिणामी रोजगार निर्मिती होऊन प्रत्येक देशाला परकीय चलन उपलब्ध होऊ लागले.

शोभाताई खेडगी यांनी देखील नगराध्यक्ष असताना शासनाकडून भरीव निधी आणून अक्कलकोटच्या धार्मिक तीर्थक्षेत्र विकासा मध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख करून पर्यटनामुळे गरिबी निर्मूलन होऊ शकते त्यासाठी संशोधकांनी त्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले.

पर्यटन परिषदेचे बीज भाषणात छत्रपती संभाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र माळी यांनी देशांतर्गत पर्यटनाच्या विकासाचा आढावा घेतला तर केंद्रीय विद्यापीठ कर्जांची कलबुर्गी येथील डॉ. महालिंगप्पा यांनी पर्यटनाच्या विकासामध्ये जीआय जीपीएस यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी लाइफ सायन्स मध्ये गुलबर्गा विद्यापीठातील डॉ.विद्यासागर व डॉ. भाले यांनी देखील संशोधनाचे स्तर सर्व सहभागी संशोधकांसमोर मांडले. या दोन्ही परिषदेमध्ये देशातील २२३ प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या परिषदेच्या निमित्ताने नवनवीन संशोधनास चालना मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीस चालना मिळावी करिता संशोधन स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट यांनी व्यक्त केले. भूगोल विषयाच्या अंतर्गत देशातील पर्यटन विकासाच्या समस्या व संधी त्यावर देखील स्पर्धा घेण्यात आलेली होती. परिषद ही सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघ,पैंजिया जॉग्रफी असोसिएशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या संयुक्त विद्यमाने पद्धतीने आयोजित करण्यात आलेली होती.
सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघाच्या वतीने भूगोल विषयात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या भूगोल प्राध्यापकास भूगोल भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट यांना कुलगुरूंच्या हस्ते पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे भूगोल विषयात प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकास जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार प्राचार्य के.एम. जमादार यांना कुलगुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. सिद्धार्थ मुरूमकर, डॉ. भैरप्पा कोणदे, वीरभद्र मोदी यांचाही सन्मान करण्यात आला. सदर परिषदेचे स्वागत डॉ. अंकुश शिंदे यांनी तर प्रास्ताविक डॉ. मुरूमकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. लता हिंडोळे यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये संशोधन पेपर वाचले गेले. विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. भूगोल विषयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या बोर्ड ऑफ स्टडीज मधील सदस्य तानाजी मगर, दीपक देडे, शिवाजी मस्के, बाळासाहेब निकम, राजकुमार मोहोरकर, हरिश्चंद्र तुपे, भैरप्पा कोणदे तर सिनेटर वीरभद्र दंडे या सर्वांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य बी. एम. भांजे व प्राचार्य जमादार यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. बी. एम. भांजे यांची निवड झाल्याबद्दल बसलींगप्पा खेडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रकाश सुरवसे, विकास भारती, चंदन सोनकांबळे, मल्लिकार्जुन सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सदर परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.