यशोगाथा

लतादीदींपासून ते शरद पवारांपर्यंत सोलापूरच्या या हॉटेलचं सगळ्यांनी केलं कौतुक

सोलापूरच्या सांस्कृतिक इतिहासात एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेचे नाव असणे ही स्वाभाविक गोष्ट मानता येईल. पण एखाद्या हॉटेलच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण होऊ नये, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मानावी लागेल. सोलापुरातील 'किनारा' हॉटेल हे असे मानांकित ठिकाण आहे

लतादीदींपासून ते शरद पवारांपर्यंत सोलापूरच्या या हॉटेलचं सगळ्यांनी केलं कौतुक

रजनीश जोशी, सोलापूर

सोलापूरच्या सांस्कृतिक इतिहासात एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेचे नाव असणे ही स्वाभाविक गोष्ट मानता येईल. पण एखाद्या हॉटेलच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण होऊ नये, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मानावी लागेल. सोलापुरातील ‘किनारा’ हॉटेल हे असे मानांकित ठिकाण आहे. प्रख्यात गायिका लता मंगेशकरांपासून माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्यापर्यंत आणि स्मिता पाटील यांच्यापासून प्रशांत दामलेंपर्यंत अनेकांनी या हॉटेलला वाखाणले आहे.

‘किनारा’मधील खाद्यपदार्थ चविष्ट तर आहेतच, पण इथे घडलेल्या आणि इथून घेतले गेलेले निर्णयदेखील बहुचर्चित झालेले आहेत. ‘किनारा’च्या दुसऱ्या पिढीचे शिलेदार अनिल भिसे सांगतात, ”आमच्या हॉटेलमध्ये दादा कोंडके, उषा चव्हाण येऊन राहून गेले आहेत. दादांना आमची पाणीपुरी खूप आवडली. ते सतत गप्पा मारत आणि आम्हाला हसवत. सुशीलकुमार शिंदेंना आमची झुणका-भाकरी आवडते. ५५ वर्षांपूर्वी म्हणजे १९६९ साली सोलापूरच्या होटगी रस्त्यावर माझे बाबा दिगंबर आणि चुलते दत्तात्रय भिसे यांनी हे हॉटेल सुरू केले. सुरूवातीला फक्त रेस्टॉरंट होते. पण वाढत्या सोलापूरची गरज लक्षात घेऊन आम्ही इथे लॉजिंगही सुरू केले. अनेक मान्यवरांनी आमच्या हॉटेलमध्ये आस्वाद घेतला आहे, लॉजिंगबद्दल पसंतीची पावती दिली आहे.”

पन्नास वर्षांपूर्वी सोलापूरच्या चतुःसीमा दोनेक किलोमीटरच्या आत होत्या. त्यामुळे शहरापासून पाच-सहा किलोमीटरवर होटगी रस्त्यावर प्रशस्त जागेत सुरू झालेले ‘किनारा’ खवैय्यांच्या कुतुहलाचा विषय होते. ‘किनारा’मध्ये जेवायला जाणे ही अक्षरशः क्रेझ होती. सोलापूरसारख्या कामगारबहुल गावात ‘हॉटलिंग’ फारसे केले जात नसे. मध्यमवर्गीयांची चैनीची कल्पना म्हणजे ‘किनारा’तील जेवण. उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांचे पाहुणेरावळे इथे निवासाला आणि भोजनाला येत. मात्र, काळ बदलला. ‘वीकेंड’ला हॉटेलमध्ये जेवायला जाण्याइतकी सोलापूरकरांची क्रयशक्तीही वाढली. आणि आता शहराचा विस्तार झाला आहे. ‘किनारा’ आता मध्यवर्ती झाला आहे. पण या किनाऱ्याने सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला खाद्य पुरवले, असे म्हणण्यात द्वयर्थ अजिबात नाही. ‘खाद्य’च पुरवले हे निश्चित. कित्येक नवे सांस्कृतिक संकल्प या हॉटेलमध्ये झाले आहेत. इथल्या प्रशस्त ‘लॉन’वर एकेकाळी वधुवरांचे स्वागत समारंभदेखील झाले आहेत.

‘उंबरठा’ चित्रपटाचा सोलापूरात ‘प्रीमियर शो’ होता. त्यानिमित्ताने अभिनेत्री स्मिता पाटील आल्या होत्या. रिवाजाप्रमाणे त्यांना ‘किनारा’मध्ये भोजनासाठी आणले. त्यांना इथले पदार्थ अतिशय आवडले, रुचकर भोजनाबरोबरच हॉटेलमधल्या स्वच्छतेचेही त्यांना अपार कौतूक वाटले. एकाहून एक स्वादिष्ट पदार्थांनी तृप्त झालेल्या स्मिता पाटील यांनी किचनच्या स्टाफला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्या किचनमध्ये गेल्या. तिथल्या सगळ्या ‘कूक’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तर त्यांनी दाद दिलीच, पण भांडी घासणाऱ्या मावशींचे हात हातात घेऊन त्यांचे कौतूक केले, तेव्हा त्यांचे डोळे भरून आले नसते तरच नवल! तीच गोष्ट अभिनेत्री शबाना आझमी यांची. किल्लारी भागात भूकंप झाला तेव्हा त्या इकडे आल्या होत्या. ‘लंच’साठी त्या ‘किनारा’मध्ये आल्या. इथले शाकाहारी भोजन त्यांना प्रचंड आवडले, त्यांनी ‘डिनर’ही इथेच करायचे असे ठरवून रात्रीचे भोजन ‘किनारा’मध्येच केले. माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग, माजी केंद्रीयमंत्री एन.डी.तिवारी यांनीही इथल्या चवीची प्रशंसा केली आहे.

‘किनारा’ची खासियत म्हणजे इथले पॅटिस, दहिवडा, बटाटेवडा आणि भोजनथाळी. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शरद पवार सातत्याने इथे येत आणि शाकाहारी भोजनाचा आनंद लुटत. त्यांनी इथे बसून घेतलेल्या शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक निर्णयांचे हे हॉटेल साक्षीदार आहे. शंकरराव चव्हाण, नारायणदत्त तिवारी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, विलासराव देशमुख, डॉ. श्रीराम लागू अशा अनेकांनी ‘किनारा’ हा ‘पामरां’चा नसून सामर्थ्यवानांचा आहे, हे दाखवून दिले आहे. लता मंगेशकर १९८३ साली या हॉटेलमध्ये आल्या. मोठ्या गायिकेचा यथोचित सन्मान करण्यात आला, पण इथले पदार्थ चाखून त्यांनीच हॉटेलमालकांचा गौरव केला.

सोलापूरच्या व्ही. एम. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९७७च्या बॅचचे विद्यार्थी आणि राज्यभरात वेगवेगळ्या शहरात प्रतिष्ठित झालेले डॉक्टर्स नुकतेच ‘किनारा’मध्ये आले होते. त्यांनी अनिल भिसे यांना बोलावून त्यांच्या विद्यार्थीदशेच्या काळातील आठवणी सांगितल्या. ‘किनारा’मुळे अनेकांच्या पोटाला आधार मिळाला, तर काहीजणांना जीवनाचा साथीदारही! एखादे हॉटेल असे अनेकांच्या स्मरणात कायमचे ‘वाटले’ जाणे ही खचितच असाधारण गोष्ट आहे. इथल्या हिरवळीवर काही हौशी गायकांच्या गाण्याचे कार्यक्रमही झाले आहेत.

दत्तात्रय आणि दिगंबर भिसे यांनी लावलेल्या या रोपट्याचे आता विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे. अनिल आणि त्यांच्या पत्नी संज्योती, त्याचप्रमाणे भावजय वैशाली भिसे यांच्या दुसऱ्या पिढीनंतर तिसऱ्या पिढीही हॉटेलचे कामकाज अधिक नेटाने पुढे नेत आहे. श्रीमती संज्योती यांचे नुकतेच देहावसान झाले. ‘किनारा’मध्ये पत्रकारांच्या दोन पिढ्यांनीही आस्वाद घेतला आहे. होटगी रस्त्यावर ‘किनारा’च्या रांगेत ‘संचार’, ‘केसरी’, ‘तरुणभारत’, ‘लोकमत’, ‘पुण्यनगरी’ अशा वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. ‘संचार’चे संपादक रंगाअण्णा वैद्य, अशोक पडबिद्री, विवेक घळसासी, आल्हाद गोडबोले, अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे अशा बिनीच्या संपादकांनी ‘किनारा’मध्ये पोटपूजा केली आहे. एकेकाळी हे हॉटेल पत्रकार परिषदांचे केंद्र होते. इथेच सगळ्या ‘प्रेस कॉन्फरन्सेस’ होत असत. अनेक संपादक-पत्रकार आजही ‘किनारा’मध्ये दिसतात. सगळ्या चर्चा, निर्णय डोळ्यासमोर होत असूनही भिसे कुटुंबाकडून कोणतीही बातमी कधी फुटली नाही, वृत्तपत्रांना आवश्यक असलेले गौप्य त्यांनी कायम राखले. ग्राहकांचा असाही विश्वास त्यांनी अबाधित ठेवला.

सर्वात स्वच्छ हॉटेलचा पुरस्कार ‘किनारा’ला मिळाला आहे. विशेषतः कोरोना लाटेनंतरच्या काळात त्याचे महत्त्व मोठे आहे. उत्तम, घरगुती चवीच्या भोजनथाळीचे सातत्य तिसऱ्या पिढीतही आढळते. रेस्टॉरंटसाठी वीस जणांचा स्टाफ सेवारत असतो. काहीजण वर्षानुवर्षे इथे सेवेत आहेत. त्यांची कुटुंबे या हॉटेलवरच मोठी होत आहेत. कटलेट, मिसळ, पाणीपुरीपासून हवे ते चटकदार पदार्थ इथे मागणीनुसार उपलब्ध आहेत. त्यामुळेच कुसुमाग्रजांच्या शब्दात बदल करून सांगायचे झाले तर ”अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, ‘किनारा’ तमाम ‘खवय्यां’ना…” असे म्हणता येईल.
हॉटेल संचालक अनिल भिसे यांचा मोबाईल क्रमांक : 9921341213

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button