गेल्या 42 वर्षात अक्कलकोट तालुक्यातील एकाही गावात उजनीचे पाणी थेटपणे पोहोचलेले नाही.
राज्य सरकारसह केंद्राच्या पंतप्रधान सिंचाई योजनेतून निधी उलपब्ध करण्याची मागणी पुढे येत आहे.

अक्कलकोट, दि.17 : गेल्या 42 वर्षात अक्कलकोट तालुक्यातील एकाही गावात उजनीचे पाणी थेटपणे पोहोचलेले नाही.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा दूर व्हावा याकरिता जून 1980 पासून उजनीत पाणीसाठा होवू लागला. जिल्ह्यातील 8 लाखाहून अधिक हेक्टरपैकी 1.75 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. परंतु कर्नाटकच्या सिमेवरील अक्कलकोटमधील एकाही गावात उजनीचे पाणी मागील 42 वर्षात थेटपणे पोहोचलेले नाही. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 30 टक्के क्षेत्र धरणातील पाण्यातून भिजते, याच संधीचा फायदा कर्नाटक सरकार घेत असल्याची बाब समोर आली आहे.
उजनी धरणावरु 11 उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहेत. यामध्ये शिरापूर, एकरुख, दहिगाव, देगाव, आष्टी, बार्शी अजूनही सदरच्या सिंचन योजना पूर्ण झालेल्या नाहीत. अक्कलकोट तालुक्यातील 9 हजार हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास 4 हजार हेक्टर म्हणजेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रासाठी महत्त्वाची असलेली एकरुख योजनेचे काम गेल्या दोन दशकापासून पूर्ण झालेले नाही. सध्याच्या परिस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील 14 हजार 688 हेक्टर एवढ्याच क्षेत्राला उजनीचे पाणी मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यातील एकाही गावात उजनीचे पाणी थेटपणे पोहोचलेले नाहीत. तालुक्यातील अनेक गावांना जोडणार्या रस्त्यांची देखील चाळणी झाल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला असतो. अशी वस्तुस्थिती आहे. देगाव योजनेची 2007 मध्ये सुरुवात झाली. सदरच्या जोड कालव्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर-हैद्रापर्यंत पाणी पोहोचणार आहे. ही देखील योजना गेल्या दोन दशकापासून अपूर्णच आहे. 2015 नंतर सुप्रमा मिळाली. सन 2018 मध्ये देगाव जोडकालवा म्हणून मान्यता मिळाली. या योजनेला 475 कोटी रुपये खर्च मंजूर झाला असून सध्या होटगीपर्यंत पाणी पोहोचणार असले तरी तेथून लिफ्ट इरिकेशन स्कीमच्या माध्यमातून पुढे 40 कि.मी.अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा, तोळणूर, नागणसूरपर्यंत पाणी नेले जाईल. याला सुध्दा निधीची कमतरता आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पामुळे 2 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्राला पाणी मिळते. तर दुसरीकडे तालुक्यातील हंजगी, चिक्केहळ्ळी, शिरवळवाडी, डोंबरजवळगे, गळोरगी, काझीकणबस, बोरगाव, भुरीकवठे या 8 लघु प्रकल्पातून केवळ 2 हजार 849 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळते. पाऊस कमी झाल्यास हे प्रकल्प कोरडी ठाक असतात. दक्षिण तालुक्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील रामपूर-हणमगाव हे लघु प्रकल्प असून त्यातून 900 हेक्टर क्षेत्र भिजते. दोनही तालुक्यातील सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत उजनीचे पाणी मागील 42 वर्षात पोहोचलेले नाही. बॅरेजस बांधून पाणी अडविण्याचे घोषणा झाले, पण काहीच झाले नाही.
तरी सदरचे योजना पूर्ण होवूतोपर्यंत निधी उपलब्ध करणेकामी राज्य सरकारसह केंद्राच्या पंतप्रधान सिंचाई योजनेतून निधी उलपब्ध करण्याची मागणी पुढे येत आहे.
