कुरनूर येथे शाहीरी पोवाड्याच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा २०२५

कुरनूर येथे शाहीरी पोवाड्याच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुरनूर (ता. अक्कलकोट) – राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्राची लोककला शाहीरी पोवाड्याचा शानदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरनूर येथे शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शाहीर अविष्कार देशिंगे यांनी आपल्या प्रभावी शाहीरी सादरीकरणातून उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या पोवाड्यातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि जिजाऊंच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी संदेश मांडण्यात आला. प्रेक्षकांनी पोवाड्याला उत्स्फूर्त दाद दिली आणि वातावरणाला एक वेगळीच रंगत आणली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. माऊली पवार (समन्वयक – सकल मराठा समाज) यांच्या हस्ते करण्यात आले. मा. श्री. राजन (भाऊ) जाधव (माजी स्थायी समिती सभापती, सोलापूर) हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते, तर मा. श्री. जैनोद्दीन पठाण (आडत व्यापारी, सोलापूर) प्रमुख उपस्थित म्हणून लाभले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील लोकांच्या मदतीसाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली. उद्योजक मार्गदर्शन समिती, शैक्षणिक मार्गदर्शन समिती, आणि आरोग्य सहाय्यक समिती या माध्यमातून लोकसेवा करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. या उपक्रमांमुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारची मदत व मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमात मारुती सुरवसे यांना ‘आदर्श पालक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या समाजासाठीच्या कार्याची आणि पालकत्वातील आदर्श भूमिकेची विशेष दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वजीत प्रकाश बिराजदार व त्यांच्या कार्यकारी मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपस्थित नागरिकांनी या शाहीरी कार्यक्रमाची विशेष प्रशंसा केली आणि भविष्यात असे प्रेरणादायी कार्यक्रम अधिक आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.