गावगाथा

सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – श्रीपाद महाराज गोंदीकर

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात जन्माष्टमीनिमीत्त आयोजीत कीर्तन सेवेत ह.भ.प.श्रीपाद महाराज मुळे यांचे निरुपण.

सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – श्रीपाद महाराज गोंदीकर

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात जन्माष्टमीनिमीत्त आयोजीत कीर्तन सेवेत
ह.भ.प.श्रीपाद महाराज मुळे यांचे निरुपण.

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं वटवृक्ष मंदीरात व संस्थेच्या विठ्ठल मंदीरात श्रीकृष्ण जन्मोत्सव-पाळणा व दहीहंडी गोपाळकाला संपन्न.

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा आरती संपन्न.

(श्रीशैल गवंडी,दि.१६/०८/२०२५.अ.कोट)
सज्जन भक्तांचे परिपालन आणि दुष्टांच्या विनाशाकरीता प्रत्येक युगात धर्मरक्षणासाठी वेगवेगळ्या रूपातून भगवंत अवतार धारण करतात असे निरुपण जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र अंबड येथील कीर्तनकार ह.भ.प.श्रीपाद महाराज गोंदीकर यांनी केले.
ते श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्या निमीत्त श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात आयोजीत करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत आपल्या ओजस्वी, हृदयस्पर्शी कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दिव्य प्रसंग कथन केला. यामध्यमातून कीर्तनकार ह.भ.प.श्रीपाद महाराज गोंदीकर यांनी निरुपण केले. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ह.भ.प.श्रीपाद महाराज गोंदीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.
पुढे कीर्तनाच्या पूर्वरंगानत संत तुकाराम महाराजांच्या “धर्म रक्षावया अवतार घेसी । आपुल्या पाळीसी भक्तजना” या अभंगाचे सखोल निरूपण करून उपस्थित श्रोत्यांना भक्तिभावाच्या गंगेत डुंबविले. या प्रसंगी अम्बरीष राजाचा दृष्टांत देत त्यांनी हे स्पष्ट केले की, भक्तांचा अपमान सहन न करता स्वतः श्रीविष्णूने सुदर्शन चक्राद्वारे दुर्वासा ऋषींनाही धडा शिकवला. त्यामुळे भगवंत भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात, हे या प्रसंगातून अधोरेखित होते. उत्तररंगात श्रीपाद महाराजांनी भगवान प्रभू गोपालकृष्णांचा जन्मोत्सव उत्कटतेने मांडला. कारागृहातील देवकी-वासुदेव प्रसंग, श्रीकृष्णाचा चमत्कारिक जन्म, नंदगावातील आनंदोत्सव या घटनांचे प्रभावी वर्णन करून उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. “जय श्रीकृष्ण”च्या घोषात संपूर्ण मंडप दुमदुमला आणि भक्तगण आनंदोत्सवात रंगून गेले. आज गोपाळकाल्यानिमीत्त
सदगुरुंच्या कृपेनेच जीवन परिपूर्ण होवून आपलं जीवन इतरांसाठी प्रसादरुप बनतं यालाच गोपाळकाला म्हणतात, म्हणून आपले जीवन इतरांसाठी गोपाळकाल्याचा प्रसाद बनावा असेही निरुपण ह.भ.प. श्रीपाद महाराज मुळे यांनी केले.या कीर्तनाला हार्मोनियमची मधुर साथ प्रा.ओंकार पाठक यांनी केली, तर तबल्याची तालबद्ध साथ नितीन दिवाकर यांनी दिली. यामुळे कीर्तनाचे सौंदर्य अधिक खुलले आणि श्रोत्यांनी संगीत व भक्तीचा सुरेख संगम अनुभवला. जन्माष्टमीदिनी मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थानच्या ए.वन चौक येथील विठ्ठल मंदीरात रात्री ९ ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व त्यानंतर गुलाल पुष्प वाहुन, पाळणा गीत व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती करुन
मोठ्या भक्तीभावाने श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज गोपाळकाला रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर श्री विठ्ठल मंदीर व
देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात दहीहंडी फोडून गोकुळ अष्टमी उत्सवाची सांगता झाली. यानंतर सर्व उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना देवस्थानच्या वतीने भोजन महाप्रसाद देण्यात आले. यावेळी विश्वस्त मंडळाचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, अक्षय सरदेशमुख, मयुरेश स्वामी, आदित्य जोशी, गिरीश पवार, कौसल्या जाजू, निंगूताई हिंडोळे, शकुंतला कटारे, संजय मोरे, दर्शन घाटगे, समीर नाईक, आदीत्य गवंडी, रविराव महींद्रकर, मनोज जाधव, विपूल जाधव, स्वामीनाथ मुमुडले, दर्शन पाटील, प्रदीप हिंडोळे, अक्षय सरदेशमुख आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button