*नैसर्गिक सौंदर्याने नटलेली कोकणची पुण्य भूमी आणि मी स्वतः अनुभवलेली गोड कोकणी माणसं*
कोकणाचे सौंदर्य

नैसर्गिक सौंदर्याने नटलेली कोकणची पुण्य भूमी आणि मी स्वतः अनुभवलेली गोड कोकणी माणसं
जवळजवळ दोन एक वर्षांपूर्वी मी कोकणावरती, आपली काही काळ कर्मभूमी असलेल्या दापोली वरती एक लेख लिहिला होता….गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा कोकणाबद्दल काहीतरी लिहावं अशी भावना मनामध्ये सतत उफाळून येत होती.
आपण ज्या भागात, ज्या मातीत जन्माला येतो, ती माती आपल्याला आपल्या माते समान प्रिय वाटते. तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड प्रेम, अभिमान ,स्वाभिमान हे ओतप्रोत भरलेल असत.वेगवेगळ्या भूखंडाची अथवा वेगवेगळ्या प्रदेशाची भावनिकदृष्ट्या तुलना ही होऊच शकत नाही. प्रत्येक ठिकाण हे आपल आपल वेगळेपण जपत आपापल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असतं .आपण काही कामानिमित्त ज्या देशात, ज्या प्रदेशात, ज्या भागात वास्तव्य करतो त्या प्रदेशाबद्दल, तेथील माणसांबद्दल आपल्या मनामध्ये कळत नकळत एक आदरभाव, आपुलकी निर्माण होत असते. ती मातीही आपल्याला प्राणप्रिय वाटू लागते. मग आपोआपच तिच्याबद्दलच्या भावना या मनामध्ये घर करून राहतात व मनातील भावना या शब्द रूपामध्ये अशा आपोआप ओसंडून वाहू लागतात. मग कळत नकळत पेन हातामध्ये घेऊन ते अशा प्रकारे शब्दबद्ध केल्याशिवाय माणसाला चैनच पडत नाही. कोकणामध्ये असताना जे जे पाहिलं ,जे जे अनुभवलं ते शब्दबद्ध करतोय. ज्या कोकण भूमीने शिवछत्रपतींच्या स्वराज्याला अभेद्यपण दिलं ,विस्तीर्ण पसरलेल्या अरबी समुद्रामध्ये प्रचंड आरमार उभारून परकीय मदमस्त सत्ता पीपासू वृत्तीला ,सत्ताधीशांना वेसण घालून या स्वराज्याची प्रदीर्घ काळ सेवा केली त्या कोकण भूमीमध्ये काही काळ वास्तव्य करण्याचा योग मला आला. हे मी माझे परमभाग्य समजतो.कोकणाबद्दलच्या खूप गोड आणि रम्य आठवणी हृदयाच्या एका कप्प्यामध्ये साठऊन ठेवले आहेत. ती माझ्या जगण्याची प्रेरणा आहे. कोकणच्या निसर्गामध्ये गोडवा,पाण्यात गोडवा, माणसात गोडवा, हापूस आंब्यात गोडवा किंबहुना सगळ्यातच गोडवा हे मी माझ्या वास्तव्याच्या काळात मनसोक्त अनुभवलंय. म्हणून ते सारं आज शब्द रूपाने बाहेर पडते आहे. त्या भावनेतूनच मी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करत आहे . सदा सर्वकाळ हा कोकण सुंदर नयनरम्य भासतो. पण कोकणच्या सौंदर्यामध्ये सर्वात जास्त भर पडते ती पावसाळ्यामध्ये .पावसाळ्यामध्ये खूप ठिकाणी आकाशातील ढग हे उंच उंच डोंगरांच्या कडेवर बसून त्याच्याशी तासंतास हितगुज करत असतात.एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करत असताना, एकमेकींना गहिवरून येतं आणि कडेवर बसलेला ढगोबा हा त्या उंच उंच डोंगराला आपल्या अश्रूंनी न्हाऊ घालतो आणि ही डोंगरमाय त्या अश्रूंना अंतर्मनात खोलवर साठवून घेते .ती डोंगरमाय आपल्यामध्ये साठवून ठेवलेले अश्रू रुपी पाणी वर्षभर वृक्षांना, पानांना, फुलांना पक्षांना, प्राण्यांना पुरवत असते. आणि आकाशातून ढगोबा हे सार पाहून खूप आनंदित होतो आणि माझ्या अश्रूंची फुले झाली या भावनेने तो तृप्तीची ढेकर देतो. उंच उंच पर्वतांच्या कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारा या दुधाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र दिसतात. या धरणी मातेला दुग्धाभिसेक घालतात हा भास होतो. जिकडे पहाल तिकडे डोंगराच्या हिरव्यागार वनराईतून पांढरे शुभ्र धबधबे हे उंचावरून कोसळत असतात. तिथून ते धरणी मातेच्या आंगाखांद्यावर खेळत खेळत वेडीवाकडी वळणे घेत त्या अथांग अशा सागराची गळा भेट घेऊन, त्यात सामावून जातात. त्या सागराच्या भेटीसाठी अनिवार अपार वेगाने कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये मित्रांसोबत आंघोळ करण्याची मजा ही काही औरच असते. कोकणातील नदी नाले हे आपल्या आजूबाजूचा निसर्ग, पशुपक्षी, प्राणी, माणूस या सर्वांच्या जीवनामध्ये समृद्धीचे सिंचन करत, त्यांना जलरूपी गोड अमृत पाजत, मंद पावलांनी ती अवाढव्य अश्या सागराच्या मिठीमध्ये प्रेम भरल्या नजरेने, मायने विसावते आणि तो सागर दादा तिला अतिशय प्रेमाने कुरवाळतो आणि ते दोन जीव एकरूप होऊन जातात. नारळ पोपळीच्या झाडासकट अनेक प्रकारची झाडे ही त्या उंच आकाशाला स्पर्श करण्याची स्पर्धा करत असतात. कोकणात प्रसिद्ध असलेल्या भातशेतीच्या बांधावरून जात असताना त्याचा तो सुवासिक वास मनाला प्रसन्न करतो. भात शेतीतून स्वच्छंदपणे स्वैर करणारे लहान लहान ओढे एखादं गाणं गुणगुणत अलवारपणे पुढे पुढे सरकत असतात.
कोकणामध्ये वास्तव्यास असताना छत्रपतींच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेल्या दुर्गराज रायगडाला मित्रासमवेत भेट देता आले.तो पवित्र गड डोळ्यांनी न्याहाळताना शिवकाळातच आपण वावरत आहोत हा भास होत होता. शिवछत्रपतींच्या अतुलनीय शौर्याचे पराक्रमाचे प्रतीक असणारा, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभिमानाने शिवछत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगत उभा असलेला किल्ले प्रतापगड डोळ्यात साठवता आला.दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर असलेला सुवर्णदुर्ग किल्ला येणाऱ्या पिढ्यांना महाराजांची कीर्ती सांगण्यासाठी त्या बेफाम लाटांना टक्कर देत गेली साडेतीनशे वर्षांपासून अभेद्यपणे उभा आहे.दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे निसर्गाचे अद्भुत चमत्कार असलेले गरम पाण्याचे झरे पाहता आले, त्यात मनसोक्त डुंबता आलं.पन्हाळेकाझीतील नदी किनारी असलेल्या सुंदर अशा पांडवकालीन लेण्या पाहून मन तृप्त झालं. गेल्या कित्येक वर्षापासून मासेमारीसाठी,पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दाभोळ बंदरावरती कित्येक वेळा फिरता आलं.बोटीमधे बसून आनंद लुटता आल.अंजरले येथील प्राचीन कड्यावरच्या गणपतीला डोळ्यात साठवता आलं. श्री शिवछत्रपतींनी प्रत्यक्ष भेट देऊन दर्शन घेतलेल्या केळशेतील याकूब बाबा दर्यास भेट देऊन दर्शन घेता आले,साने गुरुजींचे पालगड, महर्षी कर्वे यांचे मुरुड, लोकमान्य टिळकांचे मूळ गाव चिखलगाव, स्वतः अनेक खस्ता खाऊन बाबासाहेबांच्या जीवनामध्ये प्रेमाचे, आपुलकीचे,जबाबदारीचे रंग भरणाऱ्या,त्यांच्या पत्नी माता रमाई यांच्या वणंद येथील स्मारकाला भेट देऊन मन तृप्त झाले. रमाबाईंच्या वंशज असलेल्यांशी चर्चा करताना मन भरून आलं.आपली संपूर्ण हयात शोषित, पीडित, वंचित जनसमुदायांच्या,अखिल मानव जातीच्या कल्याणाला समर्पित केलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले मंडणगड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या आंबवडे या गावी भेट देऊन तेथून प्रेरणा घेता आली. या पवित्र कोकण भूमीतून अतिरथी महारथीचा जन्म झाला. त्यांच्या त्या पवित्र ठिकाणावर, त्या स्फूर्ती स्थानावर माथा टेकवता आला.हे माझं परम भाग्य समजतो. या भूमीतील अनेक लेखक कवीनी आपल्या शब्द फुलांनी या भूमीला समृद्ध केल आहे. येथील लेखक कवींचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारत देशभर दरवळत आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे दापोलीच्या किंबहुना कोकणच्या शैक्षणिक सौंदर्यामध्ये भर घालते आहे.अनेक स्वतंत्र सैनिकांचे,भारतरत्नांचे, समाज सुधारकांचे, कलाकारांना शास्त्रज्ञांना खेळाडूंना जन्म देणारी कोकणची ही पवित्र भूमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील खूपच पुढारलेली आहे. येथील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अत्यूच्च आहे. कोकण आणि आपल्या या उर्वरित महाराष्ट्राला भौगोलिक दृष्ट्या विभाजित करणारी व या दोन्ही भागातील माणसांना एकाच भाषेत,चालीरीतीत,संस्कृतीत बांधून ठेवणारी, शिवछत्रपतींच्या स्वराज्याला अभेद्य अशी कवचकुंडल बहाल करणारी,अभेद्य अशी भिंत व अभेद्य असा दूवा म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग… ती गेले कित्येक शतके कोकण भूमीचं सौंदर्य डोळ्यांमध्ये साठवत, कुतूहलाने सर्व काही तिचं नांदणं पहात उभी आहे. साने गुरुजी यांनी श्यामची आई या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या दापोली तालुक्यातील माटवन वडवली, लाडघर, मुगीज यांच्यासह इतर परिसर हा डोळ्यांनी पाहता आला, त्यांनी चरणस्पर्श केलेल्या गावातून अनेक वेळा फिरता आलं. हे माझं परम भाग्य.समुद्राच्या खारट पाण्यामध्ये अनेक वेळा मनसोक्त डुंबता आल,त्या अवखळ समुद्राच्या लाटा अंगा खांद्यावर घेताना वेगळाच आनंद वाटायचा .कोकणच्या तांबड्या मातीने आणि तेथील माणसांनी केलेलं आमचं आदर मी आजन्म कधीच विसरू शकत नाही. माझ्यासोबत ड्युटी करणारे सहकारी चालक श्री परांजपे काका, श्री खाडे काका, श्री महाडिक काका, श्री कांदेकर अण्णा यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. कांदेकर अण्णा आणि महाडिक काका यांनी तर मुक्काम ड्युटी करत असताना डबा मला कधीच घेऊ दिला नाही. ते सतत म्हणायचे राहू दे रे चल.तू आमची आठवण ठेव. बस बाकी काय नको.परांजपे काका यांनी घरून बनवून आणलेला नास्था दाभोळच्या त्या बंदरावर बसून खाताना वेगळीच मजा यायची.ग्रामीण फेऱ्यावर ड्युटी करत असताना, दररोज गाडीमध्ये येजा करणाऱ्या माझ्या कोळी भगिनींनी मास्तर घेऊन जा थोडा म्हावरा म्हणत हक्काने मासे, सुकट देणाऱ्या त्या भगिनींना आणि रानभाजी विकणाऱ्या करवंद आंबा फणस विकणाऱ्या त्या भगिनीने दिलेले ते रानमेवा आणि त्यातील त्यांचं ते प्रेम मी जीवनभर कधीच विसरू शकत नाही.एस टी बस मुक्कामी जाण्याच्या ठिकाणी म्हणजे दापोली तालुक्यातील भोळवली ,वांजलोली, आतगाव ,आडे, भडवळे ओननवसे या गावातील बंधू भगिनींनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केलं. मंडणगड तालुक्यातील भोळवली या गावी एसटी बस मुक्कामी थांबत .तेथील एका घरामध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था होत असे,त्या घरात आजी आजोबा दोघेच राहत होते. त्यांची मुलं ही कामानिमित्त मुंबईला राहायची. ते आजी आजोबा आम्ही मुक्कामी जाईपर्यंत जेवत नसत.आम्ही गेल्यानंतर आमच्या सोबत जेवायला बसत.गरम नाचणीची, तांदळाची भाकरी, भात आमच्यासाठी वाढत असत. कधी कधी खास आमच्यासाठी माशाची भाजी करत, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे देत.थंडी दिवसामध्ये आम्हाला गरम पाणी तापउन देत.आम्ही काय दिलं हो त्यांना? काहीच नाही. मग या माणसानी आमच्यावर इतकं प्रेम केलं. इतकी काळजी घेतली. त्यावेळेस त्यांच्या माझ्या मध्ये झालेले संवाद,त्यांच्याशी केलेल्या गप्पागोष्टी आज देखील माझ्या कानात, मनात,हृदयात जसेच्या तसे साठवून ठेवले आहेत.ते आजी आजोबा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीत.अशी ही कोकणची माणसं आणि त्यांची ती माया. त्या माऊलीने आपल्या घासातील घास मला स्वतःचा मुलगा समजून भरवलं ना हो. आत्ता त्यांचा सहवास भेटत नाही, तो भविष्यातही भेटू शकत नाही ही मनामध्ये खंत आहे .पण पूर्वी भेटलेल्या त्यांच्या सहवासाच्या शिदोरीवर जीवनभर त्यांना आठवत राहू.
खरंतर कोकणी माणसं आणि त्या मातीने आम्हाला भरभरून प्रेम दिल. आज आम्ही मूळ गावी आहोत. पण आम्हाला त्यांनी दिलेलं प्रेम हे मी आजन्म कधीच विसरू शकत नाही. दापोली शहर व तालुक्यातील माझी असंख्य मित्रमंडळी आहेत,काही माझे सहकारी कर्मचारी आहेत त्यांची आपल्या अक्कलकोटच्या स्वामी महाराजांवर अपार श्रद्धा. ती लोक कधी कधी दर्शनाला येतात.तिथून निघण्यापूर्वी मला फोन लावतात आणि विचारतात काय रे एम.डी(ते मला एम. डी .म्हणतात)तू आहेस कुठे ?मी म्हणतो अक्कलकोटला. तर मग आमचे एक काम करशील?मी त्यांना म्हणतो तुम्ही हजार काम सांगा तुमच्यासाठी करेन मी. तसं नाही रे बाबा… आम्ही कुटुंबासोबत, मित्रासोबत श्री.स्वामींच्या दर्शनाला येणार आहोत. तेवढी फक्त रूमची शोधाशोध करून ठेव.आम्ही तुला फोन पे करतोय. त्यांना ऍडव्हान्स देऊन ठेव. बाकी काय नाय.मग मी म्हणतो एवढेच ना? तुम्ही बिनधास्त या. मी करतो. मग ती लोक येतात दर्शनासाठी. माझ्या ड्युटी मुळे कधी त्यांच्याशी भेट होते, कधी होत नाही. पण त्यांच्यासाठी रूम पकडून ठेवतो. योगायोगाने त्यांची माझी भेट झालीच तर एकमेकांना कडकडून मिठी मारतो आणि त्या भूतकाळातील रम्य आठवणींना उजाळा देतो. कोकणातील मातीची कौलारू घर आणि त्या घरा पुढील प्रशस्त अंगण आणि त्या अंगणातील तुळस मनाला प्रसन्न करते.कोकणी माणसांचे प्रमुख दोन सण म्हणजे गणपती आणि होळी या सणाच्या वेळी ही कामानिमित्त बाहेर गावी गेलेली सर्व माणसे ही आपल्या स्वगृही येतात.साऱ्या कुटुंबासह सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पारंपारिक नाच गाण्यांचा आनंद घेतात. पारंपारिक चांगल्या प्रथा परंपरा ही माणसं टिकउन ठेवत आहेत.पारंपरिक कोकणी लोकगीत आणि कोळी गीतांनी तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे.हे माझ्या कोकणातील वास्तव्य काळात प्रत्यक्ष अनुभवता आलं. या पुण्य कोकण भूमीने मला खूप मोठा मित्रपरिवार दिला, जो की तो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये पसरला आहे .एखाद्याच्या बोलीभाषेवरून तो कुठल्या भागातील आहे हे ओळखण्याची क्षमता निर्माण झाली .
आंबा नारळ पोपळीच्या भागातून खळखळत वाहणारे पांढरे शुभ्र झरे हे मन मोहन टाकतात. जंगल भागातून सफर करत असताना मधूनच एखाद्या पांढऱ्या शुभ्र वनगाईचे दर्शन घडतं.यासह विविध प्रकारचे प्राणी पक्षांचे दर्शन मनमोहीत करून टाकते.कोकणी भाषेमध्ये खूप गोडी आहे..
या कोकणभूमी वरती कोसळणाऱ्या बेफाम वाऱ्याने कधीकधी रौद्ररूप धारण करून सर्वच बाबतीत खूप नुकसान झालेल आहे हे मी माझ्या डोळ्यांनी अनेक वेळा पाहिले आहे.खेड शहराला जगबुडी नदीने अनेक वेळा विळखा घातला, वाशिष्टी नदीने चिपळूणला अनेक वेळा पुराच्या पाण्यात उभ केलं. अति पावसाने अनेक वेळा डोंगरकडा कोसळून अनेक गावे त्या दरडीचा शिकार बनतात. वन्य प्राण्यांची धास्ती देखील असते. या सह अनेक नैसर्गिक,मानवनिर्मित संकटांचा सामना करत असताना ही माणसं चिवटपणे आणि संकटांनी नाउमेद न होता जीवन जगत असतात. एखाद्या कंपनीचे प्रदूषण युक्त पाणी समुद्राच्या पात्रामध्ये शिरल्यामुळे अनेक वेळा मासे हे समुद्रामध्येच मरून पडतात,त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोळी बांधवांचे अतोनात नुकसान होते.
कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाने भरारी घेतली आहे.तो व्यवसाय परप्रांतीयांच्या घशात न जाता तो स्थानिक तरुणांच्या उन्नतीचा मार्ग ठरावा. कोकणाचे वेगळेपण जपत व्यवसाय सुधारावा ही अपेक्षा. दुःख तर एकाच गोष्टीच वाटतं की ,एवढा विस्तीर्ण समुद्रकिनारा हा माझ्या कोकणभूमीला लाभला.आत्ता मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय हा जोर धरत आहे. पण मूळ कोकणी माणूस या समुद्रकिनाऱ्यालगतची जमीन ही कवडीमोल किमतीमध्ये परप्रांतीयांच्या घशात घालत आहे. आणि नकळत तो आपल्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीपासून, एखादा व्यवसाय टाकून मालक बनण्यापासून दूर जात आहे.परप्रांतीय लोक ही चिराखाणी विकत घेऊन तेथे आपला व्यवसाय उभारत आहेत. स्थानिक बेघर होत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे.दिवसरात्र राबराब राबणारा माझा कोंकणी बांधव हा त्या कोकण भूमीचा राजा आहे…त्या राजाचं राजेपण हे पिढ्यान् पिढ्या अबाधीत राहील पाहिजे…ही सदिच्छा….माझ्या कोंकणी माता माउल्याना ,भावंडाना,ज्येष्ठांना, श्रेष्ठांना माझा साष्टांग दंडवत…..
अफाट नैसगिर्क सौंदर्य आणि मनामधे अपार माया घेऊन जगणाऱ्या कोकणी माणसांबद्दल लिहावं तितकं कमीच आहे….तूर्तास इतकेच….. धन्यवाद…..
