आंळदीत पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनात संतविचाराचा होणार जागर
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशनतर्फे श्री क्षेत्र आळंदी येथे 18 व 19 नोव्हेंबर रोजी आयोजन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20230918-WA0006-451x470.jpg)
आंळदीत पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनात संतविचाराचा होणार जागर
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशनतर्फे
श्री क्षेत्र आळंदी येथे 18 व 19 नोव्हेंबर रोजी आयोजन
पुणे : संत चोखामेळा महाराज यांच्या अमृतमयी शब्दधनावर आधारित पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजन करण्यात आले आहे. संत चोखोबा, संत सोयराबाई, संत बंका, संत निर्मळा, संत कर्ममेळा यांच्या विचारांचे अमृतरुपी विचार परिसंवादांमधून ऐकावयास मिळणार आहेत. संमेलन स्थळाला संत नामदेव महाराज साहित्य नागरी असे नाव देण्यात आले असून उद्घाटन स्थळाचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व्यासपीठ तर समारोप स्थळाचे श्री संत तुकाराम महाराज व्यासपीठ असे नामकरण करण्यात आले आहे. संत चोखामेळा यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण दि. 16 रोजी पुण्यात करण्यात येणार आहे.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एम. आय. टी. महाविद्यालय आळंदी, ता. खेड, जि. पुणे येथे हे दोन दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक आणि संमेलनाचे निमंत्रक सचिन पाटील, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. माणिकबुवा मोरे महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम मोरे महाराज, प्रा. विनोद सूर्यवंशी उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे (पंढरपूर) अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष संत नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. माधव नामदास महाराज, संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्या उल्का चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारी 12 वाजता आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त प्रा. अभय टिळक यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात रजनीश जोशी (श्री चोखोबांची विठ्ठलभक्ती), ह. भ. प. सचिन महाराज पवार (संत चोखोबांनी केलेले विठ्ठलाचे रूपवर्णन), डॉ. रूपेशकुमार जावळे (संत चोखामेळा यांनी विठ्ठलभक्तीचे पटवून दिलेले महत्त्व) आणि प्रा. सचिन पवार (संत चोखामेळा यांची आर्तता) यांचा सहभाग असणार आहे.
दुसरा परिसंवाद दुपारी 2 वाजता ह. भ. प. दीपक महाराज जेवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून यात प्रा. डॉ. गणेश मारेवाड (संत चोखामेळा यांनी विठ्ठलाला विचारलेले प्रश्न), डॉ. शांताराम बुटे (चोखोबांचा पंढरी महिमा), प्रा. नानासाहेब गव्हाणे (संत चोखामेळा यांची सामाजिक जाणीव) यांचा सहभाग असणार आहे.
सायंकाळी 6:30 वाजता ज्योत्स्ना चांदगुडे, अस्मिता जोगदंड-चांदणे, वैशाली मोहिते या ‘संत कवयित्री सोयराबाई एक काव्यप्रवास’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी 3:45 आणि रात्री 8 वाजता कविसंमेलनांचेही आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 19 रोजी सकाळी 9 वाजता विद्याधर ताठे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात डॉ. रूपाली शिंदे (संत सोयराबाई व संत निर्मळा यांचे हृदयस्त नाते), ह. भ. प. आनंद महाराज तांबे (विठ्ठलाने केलेले सोयराबाईचे बाळंतपण), प्रा. सोमनाथ लांडगे (संत सोयराबाई यांची सामाजिक जाणीव), 10:45 वाजता डॉ. श्यामाताई घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली चौथा परिसंवाद होणार असून यात डॉ. भावार्थ देखणे (संत चोखामेळा कृत रूपक/भारूड), डॉ. अमोगसिद्ध चेंडगे (संत चोखोबा कृत संत नामदेव स्तुती), ह. भ. प. पांडुरंग शास्त्री शितोळे महाराज (संत चोखामेळा यांच्या अभंगातील तत्त्वज्ञान) आणि डॉ. यशोधन साखरे (संत सोयराबाई यांनी विठ्ठलाला विचारलेले प्रश्न) यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी 12:15 वाजता ‘गजर भक्तीचा – सन्मान श्रद्धेचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून काही मान्यवरांचा रा. स्व. संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. विद्याभारतीचे क्षेत्रमंत्री शेषाद्री अण्णा डांगे हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
संमेलनाचा समारोप सोहळा सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून एम. आय. टी. विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मा. संपादक
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी येथे पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)