गावगाथा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न

पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या भक्ती आनंदाला उधाण

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न

पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या भक्ती आनंदाला उधाण

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६/१२/२३)
अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे
मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.

भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. आज दिवसभरात श्री दत्त जयंती निमीत्त मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम, सोलापूरचे लेखापाल संजय मर्दा, औरंगाबादचे विधिज्ञ अतुलचंद्र वर्मा, सुरतचे सुप्रसिद्ध व्यापारी हिराबेन कांकरिया, अहमदनगरचे सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, कोल्हापूरचे निस्सीम स्वामी भक्त सुहास पाटील आदींसह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आज दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्त्या खाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, नरेंद्र शिर्के, सचिन हन्नूरे, संजय पवार, दीपक गवळी, सागर दळवी, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन पेठकर, चंद्रकांत गवंडी, नरसप्पा मस्कले, रामचंद्र समाणे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – दत्त जयंती निमित्त वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी व दत्तजन्मोत्सव सोहळा, पाळणा कार्यक्रम प्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे छायाचित्रात दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button