मुरूममध्ये शोभायात्राद्वारे श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा उत्साहात साजरी
ढोल, लेझीम,भजनी, कुंभकळससह हनुमान ठरले आकर्षक

मुरूममध्ये शोभायात्राद्वारे श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा उत्साहात साजरी
ढोल, लेझीम,भजनी, कुंभकळससह हनुमान ठरले आकर्षक


मुरूम, ता. उमरगा, ता. २२ (प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी सोमवारी (ता.२२) रोजी श्री रामल्ललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा थाटात संपन्न झाली. त्याच पार्श्वभूमीवर मुरूम शहरातील सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने (ता.२१) रोजी शहरातील सर्व मंदिरात स्वच्छता, विद्युत रोषणाईने करुन मंदिर सजवण्यात आले होते. शहरातील श्रीराम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रथ सजवण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांनी राम-सीता, लक्ष्मण, हनुमानाची वेशभूषा परिधान करून सजवलेल्या पालखीत विराजमान करून संपूर्ण शहरातून वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील महिला भगिनींनी कुंभकळस घेऊन सहभागी झाल्या तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीमचे सादरीकरण केले. संगमनेर येथून आलेल्या कलाकार श्री हनुमान वेशभूषा परिधान करून संपूर्ण मुरूमकरांना आकर्षित केले. प्रत्येक चौकात फटाक्याची आतिषबीजीने, पालखी पूजनाने, जय श्रीरामाच्या घोषणेने, पालखीवर पुष्प उधळून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, चौक, घरोघरी सडा-रांगोळी, श्रीराम पताकाने शहर भगवेमय, भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणाने मुरूम नगरी दुमदुमली होती. तब्बल पाचशे वर्षांनी आयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत श्री रामल्ललाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे मुरूमकरामध्ये, श्रीराम भक्तांमध्ये आनंदमय आणि उत्साही वातवरण दिसून आले. लहान मुले श्रीरामाच्या वेशभूषा परिधान करून हातात धनुष्यबाण घेऊन पालखीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. दत्ता हुळमजगे, ओमकार पाटील, प्रदिप गव्हाणे, सिद्धलिंग हिरेमठ, जगदीश निंबरगे, आकाश क्षीरसागर, इरेश गुंडगोळे, राजकुमार लामजाने, राजकुमार वाले, संजय धुमुरे, शिवा दुर्गे आदींनी परिश्रम घेतले. या शोभायात्रेस उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड यांनी सदिच्छा भेट देवून सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या. श्रीकांत मिनियार, चंद्रशेखर मुदकण्णा, गुलाब डोंगरे, अजित चौधरी, उल्हास घुरघुरे, श्रीकांत बेंडकाळे, सुधीर चव्हाण, राहूल वाघ आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शहरातील बिअर शॉपी, ढाबे व मांसाहार दुकाने बंद ठेऊन मुस्लिम व इतर समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. श्रीरामाची शोभायात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. शहरातील सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. पोलीस यंत्रणा व नगर परिषद प्रशासनाकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीराम जन्मोत्सव समितीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथे श्रीरामाची शोभायात्रा भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात ढोल, लेझीम, भजनी, कुंभकळससह हनुमान ठरले आकर्षक
