Umarga : उमरग्याची तहेजीब शेख या विद्यार्थीनीला NEET परिक्षेत उज्वल यश ; माजी प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते तहेजीब हिचा सत्कार
मुरुम, (प्रतिनिधी-सुधीर पंचगल्ले) : ऊमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी तहेजीब रहीम शेख हिने पदवी पूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मध्ये 700 पैकी 625 गुण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचा उमरगा येथे शुक्रवार दि.14 जून रोजी लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना तहेजीब शेख हिने सांगितले की, नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात 437 गुण मिळाले होते. परंतु पुन्हा दुसऱ्यांदा जिद्दीने प्रयत्न केल्यास या परीक्षेत चांगले यश मिळवता येईल या आत्मविश्वासाने मी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच मला अपेक्षित यश संपादित करता आले.माझ्या या यशामध्ये तळमळीने मार्गदर्शन करणारे शिक्षक,मला प्रेरणा देणारे कुटुंबातील नातेवाईक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांना मला सांगावयाचे आहे की, जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषतः आपल्याला पुढे जाऊन काय करावयाचे आहे याबाबत आपले निश्चित ध्येय हवे. ते ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करावयास हवेत तरच आपले अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकते.मी गरीब आहे, खेड्यातून आहे असे म्हणून विद्यार्थ्यांनी मनात न्यूनगंड बाळगता कामा नये. आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण आपल्या जीवनाच्या प्रगतीची वाट चोखाळली पाहिजे असेही तहेजीब म्हणाली.
