Pune – solapur highway : पुणे – सोलापूर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले ; गत वर्षात झाले तब्बल इतके गंभीर अपघात

सोलापूर (प्रतिनिधी): पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ते इंदापूर या सुमारे २० किलोमीटर लांबीच्या टप्प्यात अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणांवर आवश्यक उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून वारंवार अपघातास निमंत्रण मिळणारी काही ठिकाणे प्रकर्षाने समोर येऊ लागली आहेत. या पट्ट्यातील चढ-उताराची ठिकाणे, अरुंद पूल, बेकायदेशीर रस्ता दुभाजक यांसारख्या काही गोष्टींमुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.

गतवर्षी महामार्गाच्या भिगवण ते इंदापूर या सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात सुमारे ३२ प्राणांकित, २६ गंभीर तर शेकडो किरकोळ अपघात झाले आहेत. यापैकी बहुतांश अपघात भिगवण ते पळसदेव या सुमारे २० किलोमीटर लांबीच्या टप्प्यात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातांच्या ठिकाणांवर तातडीने उपाययोजनांची गरज असल्याचे मत स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होऊन सुमारे एक तपाचा कालावधी उलटला आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून एकंदरीत कमी खर्चात काम करण्यास प्राधान्य दिल्याचे प्रकर्षाने जाणवते. महामार्गावरील अनेक जुने, अरुंद पूल कायम ठेवण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचे चढ-उतारही कायम ठेवण्यात आले आहेत. हेच अरुंद पूल व चढ-उताराची ठिकाणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज येत नसल्याने अनेक सुसाट वेगाने जाणारी व अवजड वाहने पुलाला धडकून अपघात झाले आहेत. तर चढ-उताराच्या ठिकाणी अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या ऊस वाहतुकीच्या वाहनांना चढ चढताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चढाला ट्रॅक्टरचालकाला ट्रॅक्टरची पूर्ण ताकद वापरावी लागते. हे दररोजचे असल्याने ट्रॅक्टरमध्ये बिघाड होऊन खर्चाला सामोरे जावे लागत असल्याचे काही ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकांनी सांगितले. तर उतारावर पूर्ण क्षमतेने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे ठरत असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
महामार्गावरील चढ-उताराची ठिकाणे, अरुंद पूल यांसारख्या ठिकाणांवर अपघात होत असल्याचे समोर आले आहे. भिगवण ते पळसदेव या पट्ट्यात चार धोकादायक अरुंद पूल आहेत. तर पाच ठिकाणी तीव्र चढ-उतार असल्याने बऱ्याचदा वाहनचालकांचे नियंत्रण सुटणे, टायर फुटणे यामुळे अपघात होत आहेत. याठिकाणी आवश्यक उपाययोजनांची गरज आहे.
-महेश कुरेवाड, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग पोलिस केंद्र
अपघाताची ठळक मुद्दे
अरुंद पूल – १) भिगवणनजीक मदनवाडी पाटी, कुंभारगावपाटी, २) भादलवाडी येथील ओढ्यावरील पूल, ३) पळसदेव येथील उजनीच्या पाणलोटक्षेत्राच्या फुगवट्यावरील पूल.
धोकादायक चढ-उताराची ठिकाणे – १) पोंधवडी, २) डाळज क्र. २, डाळज क्र. १, ३) काळेवाडी.