

…………………………………………

विवाहात आहेर म्हणून दिली तुकाराम गाथा भेट : तुषार पटील यांचा स्तुत्य उपक्रम

पुणे : येथील सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील पीएच.डी. संशोधक तुषार पाटील यांचा जागृती यांच्याशी अमळनेर, जि. जळगाव येथे मराठा मंगल कार्यालयात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात पाटील यांच्याकडून आलेल्या पाहुण्यांना विवाहाचा आहेर म्हणून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा सप्रेम भेट म्हणून देण्यात आली.

प्रत्येक लग्नात आहेर म्हणून साडी अथवा भांडे देण्याच्या काळात तुषार यांनी तुकाराम गाथा आहेर म्हणून देत एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात वाचन संस्कृती रुजावी या ध्येयाने आणि दिवसेंदिवस भरकट चाललेल्या समाजाला एक योग्य दिशा मिळावी या विचाराने प्रेरित होऊन आम्ही तुकाराम गाथा आहेर म्हणून देण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. बाजारात भरपूर प्रकाशन संस्थांच्या तुकाराम गाथा उपलब्ध आहेत. मात्र तुकाराम महाराज संस्थान, देहू (पुणे) येथील मूळ प्रती भेट म्हणून देत आहोत, असेही ते म्हणालेत.

विवाह सोहळ्यात गाथा भेट म्हणून दिल्याची वऱ्हाडी मंडळींनी व मान्यवरांनी प्रशंसा केली. तसेच सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरांना विधायक स्वरूप देण्याच्या पाटील यांच्या प्रयत्नांचे अनुकरण इतरांनीही करायला हवे, अशी अपेक्षा विवाहावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
पाटील यांचे निंभोरा (ता. धरणगाव, जि. जळगाव) गावी राहत्या घरी वडिलांच्या नावे सार्वजनिक वाचनालय असून समाजात वाचन संस्कृतीला रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सदर वाचनालय ते कोणत्याही शासकीय अनुदानाविना खासगी फंडातून चालवतात.
…………………………………………
कोट :
वाचन ही देखील मानवाची मूलभूत गरज आहे. वाचनाने मानवाच्या आयुष्याला कलाटनी मिळते. मात्र काय वाचायला हवे, हे समजणे देखील फार महत्त्वाचे आहे. या जाणीवेपोटी आम्ही मराठीतील आद्यकवी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा वऱ्हाडी मंडळींना आहेर म्हणून दिली.
– तुषार पाटील (वर)
…………………………………………