सोलापूरात कन्नड शाळा व शिक्षकांच्या हक्कांसाठी धरणे आंदोलन
सोलापूर, दि. 21 जून (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील कन्नड शाळा, कन्नड शिक्षक आणि कन्नड भाषिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात आदर्श कन्नड बळगच्या नेतृत्वाखाली विविध कन्नड संघटना, शिक्षक संघटना आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

कन्नड शाळांचे संरक्षण, टीईटी व टीएआयटी परीक्षा कन्नड माध्यमातून घेणे, केंद्रप्रमुख पदांमध्ये कन्नड भाषिकांना संधी देणे, शिक्षण विभागातील सर्व परीक्षा कन्नड भाषेत उपलब्ध करणे, कन्नड शाळांमध्ये नियुक्त मराठी माध्यम शिक्षकांचे बदलीकरण करणे, अंगणवाड्यांमध्ये कन्नड जाणणाऱ्या सेविकांची नियुक्ती करणे, कन्नड शाळांना भाषिक अल्पसंख्याक दर्जा देणे, बसवेश्वर प्राधिकरणामार्फत विशेष अनुदान उपलब्ध करून देणे, सीमाभागात बसवेश्वर विद्यापीठाची स्थापना करणे तसेच शैक्षणिक सॉफ्टवेअर, तांत्रिक साधने आणि पाठ्यसामग्रीमध्ये कन्नड भाषेचा समावेश करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार म्हणाले, “कन्नड शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून टीईटीसह विविध परीक्षा कन्नड भाषेत घेण्यात याव्यात. अंगणवाड्यांमधील कन्नड भाषिक मुलांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. यासाठी आम्ही कन्नड बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
शिक्षक संघटनेचे नेते वीरभद्र यादवाड यांनी सांगितले की, “कन्नड आणि मराठी या परस्परांशी घट्ट नात्याच्या भाषा आहेत. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कन्नड भाषिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या शैक्षणिक व भाषिक हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे.”
बंगळुरूहून आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेले कर्नाटक रक्षण वेदिकेचे पदाधिकारी विजयकुमार यांनी, “कर्नाटकात मराठी भाषिकांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कन्नड भाषिकांना न्याय द्यावा,” अशी मागणी केली.
या आंदोलनात निवृत्त विस्तार अधिकारी रतिलाल भुसे, राजशेखर उमराणीकर, सुरेश शटगार, शंकर अजगोंडे, धरेप्पा कट्टीमनी, रणजित तिटे, सूर्यकांत हत्तूर, प्रकाश कोळी, अशोक पोमाजी, सिद्दराय तेग्गेळी, राजश्री मुन्नोळी, शालुभाई कोरे, राजश्री हलसंगी-चिंचोळी, बसवराज धनशेट्टी, महेश मैत्री, मल्लिकार्जुन गुरव, कांतेश अक्कलकोटे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कन्नड संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यिक, महिला प्रतिनिधी आणि शेकडो कन्नडप्रेमी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे स्वागत विद्याधर गुरव यांनी केले. सूत्रसंचालन बसवराज गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन शरणप्पा फुलारी यांनी केले.
कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करणार
“महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांच्या समस्या कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाईल,” असे कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमण्णा बेविनमरद यांनी सांगितले.
मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
“महाराष्ट्र सरकारने कन्नड शाळा आणि कन्नड शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आदर्श कन्नड बळगचे अध्यक्ष मलिकजान शेख यांनी दिला.
शिक्षण विभाग सकारात्मक
“जिल्हास्तरावर सोडविता येणाऱ्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. काही मागण्यांसाठी राज्य शासनाची मंजुरी आवश्यक असून त्याबाबत शासनाला आधीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कन्नड शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे,” असे जिल्हा शिक्षणाधिकारी खादर शेख यांनी स्पष्ट केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!