
उपळाई ते पॅरिस… बार्शीच्या स्मिता रगडेंची प्रेरणादायी गगनभरारी

बार्शी |

कर्मवीर मामासाहेब जगदाळे आणि वाहिनीसाहेब झाडबुके यांनी बार्शीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यामुळेच, तालुक्याच्या गाव खेड्यातील मुलं-मुली उच्च शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. बार्शीतून अनेक अधिकारी घडले, शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर्सची जडण घडण येथेच झाली. काहींनी विदेशातही बार्शीची सरशी केली आहे. तालुक्याच्या उपळाई ठोंगे येथील स्मिता रगडे यांनीही असंच यशाचं शिखर गाठलं. इंजिनिअरिंगनंतर फ्रान्समधील नामांकित कंपनीत त्या कार्यरत असून तब्बल 60 हजार युरोचं पॅकेज त्यांना मिळालं आहे.

स्मिता रगडे-भोंग या मूळच्या उपळाई ठोंगे गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या. त्यामुळे, साहजिक गावातीलच किसान कामगार विद्यालयात त्यांचं इयत्ता 10 वी पर्यंतचं शिक्षण झालं. याकाळात घर ते शाळा अशी दररोज 5 किमीची पायपीट करून त्यांनी आपली शिक्षणाची आवड जोपासली. त्यामुळेच, आज त्यांची गगनभरारी ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारी आहे.

स्मिता यांनी 10 वी नंतर बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालयात 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर, उस्मानाबाद येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली. विशेष म्हणजे उपळाई ठोंगे गावातून पहिली महिला इंजिनिअर होण्याचा मानही त्यांनी पटकावला, हे त्यांचे पती सचिन भोंग अभिमानाने सांगतात. इंजिनिअरिंगनंतर पुण्यात HCL आणि जॉन डिअर कंपनीत त्यांनी नोकरी केली. दरम्यानच्या काळात त्यांचे पती सचिन यांनी नवरा आणि मित्र बनून मोलाची साथ दिली. त्यामुळेच, पुढे गगनभरारी घेण्याचा आत्मविश्वास वाढला. समायरा आणि शिवांश या दोन चिमुकल्यांची जबाबदारी सांभाळत घर आणि नोकरीचा समतोल साधला. अर्थात, यशस्वी महिलेच्या पाठीशीही एक पुरुष असतो, हेच त्यांचे पती सचिन यांनी दाखवून दिले. कारण, Pwd विभागात ठेकेदार असतानाही त्यांनी स्मिता यांच्या करिअरला बुस्ट देण्याचं काम केलं. त्यामुळेच, स्मिता यांनी टॅलेंट आणि अनुभवाच्या जोरावर पॅरिस गाठलं. 4-5 हजार लोकवस्तीच्या गावातील कन्येनं बार्शी तिथं सरशी ही म्हण सत्यात उतरवून दाखवली.

स्मिता आज फ्रान्समधील फॉर्व्हिया कंपनीत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट लीड पदावर कार्यरत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी पॅरिसमध्ये ऑफिस जॉईन केलं. त्यांना येथील कंपनीत 60 K Uros म्हणजे 51 लाख रुपये प्रतिमाह सॅलरी आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवरइवढी उंची त्यांनी आपल्या कर्तृत्वातून गाठली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच, त्यांचा प्रवास बार्शीसह देशाच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी उपळाई ते पॅरिस व्हाया पुणे असा प्रेरणादायी जर्णी सांगणारा आहे. दरम्यान, स्मिता यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थ आणि त्यांच्या क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.