PCMC : घाटकोपर दुर्घटनेनंतर पिंपरी – चिंचवड पालिका प्रशासन अलर्ट मोडवर ; शहरातील १२०० अधिकृत होर्डिंग्ज ची करणार स्ट्रक्चरल ऑडिट
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निगडी (प्रतिनिधी) दि.१५, मुंबईतील घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आला आहे. या दुर्घटनेनंतर होर्डिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 1200 अधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
महापालिका प्रशासनाने होर्डिंग चालक, मालकांची बैठक घेऊन स्ट्रक्चरल ऑडिटचा दाखला घेतला. शहरात 31 मार्च 2024 अखेर 1 हजार 136 अधिकृत होर्डिंग होते. त्यानंतर परवाना विभागाने नव्याने 60 होर्डिंगला परवानगी दिली. त्यामुळे शहरात एकूण 1 हजार 196 अधिकृत होर्डिंग सद्यस्थितीत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या मार्गाच्या दोन्ही बाजूला 35 मोठ-मोठे होर्डिंग आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावरून पंढरपुरकडे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा दरवर्षी मार्गस्थ होत असतो. यंदा जूनअखेर पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या मार्गावर एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच धोकादायक होर्डिंग काढण्याची मागणी होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
शहरातील सर्व होर्डिंग मजबूत असल्याची खातरजमा करावी. कमकुवत असेल तर ते त्वरित हटविण्यात यावे, अशा सूचना पालिकेने एप्रिल महिन्यातच दिल्या होत्या. वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने सांगाडा पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित सांगाडा धारकांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालिकेने यापूर्वीच दिला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)